खिशाला कात्री! दूध ९ रुपयांनी महागणार, ऑटो-टॅक्सी भाडेही वाढणार

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
मुंबई,
milk prices to rise by 9 सप्टेंबरच्या सुरुवातीपासून मुंबईकरांच्या दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार असून, दुसरीकडे दुधाच्या घाऊक दरातही प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईकरांना प्रवासासोबतच दुधासाठीही अधिक पैसे मोजावे लागू शकतात.मुंबई दूध उत्पादक संघटनेने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ९३ रुपये प्रति लिटर असलेला घाऊक दर आता १०२ रुपये प्रति लिटर होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहतील. पशुखाद्याच्या वाढलेल्या किमतींमुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. धान्य, हळद आणि हरभरा यांसारख्या पशुखाद्यांच्या दरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने दुग्ध उत्पादकांवरील आर्थिक भार वाढला आहे.
 
milk prices to rise by 9
 
मात्र, दुधाच्या घाऊक दरातील या वाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील दरावर किती होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या दुधाची अंतिम किंमत संबंधित विक्रेते आणि दूध कंपन्या ठरवणार आहेत. त्यामुळे घाऊक दर १०२ रुपये झाल्यानंतर किरकोळ ग्राहकांना नेमका किती दर द्यावा लागेल, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.याचवेळी मुंबईतील सीएनजीवर धावणाऱ्या ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही १ सप्टेंबरपासून वाढ होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. नव्या दरानुसार टॅक्सीचे पहिल्या १.५ किलोमीटरचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. ऑटो-रिक्षाचे किमान भाडेही २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आले आहे.
 
टॅक्सीच्या प्रति किलोमीटर भाड्यातही वाढ करण्यात आली असून, ते २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये होईल. ऑटो-रिक्षासाठी प्रति किलोमीटर दर १७.१४ रुपयांवरून १८.२२ रुपये करण्यात आला आहे. नव्या भाड्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑटो आणि टॅक्सीच्या इलेक्ट्रॉनिक मीटरचे पुनर्मापन करावे लागणार आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर आणि रोजच्या प्रवासाच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुधाच्या घाऊक दरवाढीचा किरकोळ किमतीवर नेमका किती परिणाम होईल, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.