अमरावती
navneet-rana-ties-rakhis रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना, अंगरक्षकांना तसेच पोलिसांना राखी बांधून व ओवाळून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा भावनिक उपक्रम राबविण्यात आला.
देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी जवान दिवस-रात्र तत्पर असतात. ऊन, वारा, पाऊस किंवा कोणतीही परिस्थिती असो, आपल्या कर्तव्यापासून ते कधीही मागे हटत नाहीत. माझ्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक सुरक्षा जवानाच्या समर्पणाला मी मनापासून सलाम करते, अशी भावना नवनीत यांनी व्यक्त केली.
लाडक्या बहिणींसोबत रवी राणांचे रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त शंकर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात आमदार रवी राणा यांना हजारो लाडक्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा भावनिक आणि उत्साहपूर्ण सोहळा सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होता. आ. राणा यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार आणि खासदारांचे पगार कमी करून राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणारे मानधन प्रतिमहिना १५०० रुपयांवरून ३००० रुपये करावे, अशी मागणी केली आहे. लाडक्या बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. रक्षाबंधन सोहळ्यास उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, नगरसेविका सुमती ढोके, शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे, अर्चना पांडे, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, योगेश विजयकर, मीरा कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.