काठमांडू,
panic mode returns in nepal नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या भीषण पुराचे संकट अद्याप पूर्णपणे ओसरलेले नसतानाच नुवाकोट जिल्ह्यात पुन्हा मोठ्या महापुराची शक्यता निर्माण झाली आहे. धुंडे बाजार आणि आसपासच्या परिसरात परिस्थिती गंभीर झाल्याने प्रशासनाने ‘पॅनिक मोड’ लागू केला आहे. वरच्या भागातून पाण्याचा मोठा लोंढा आल्यास अवघ्या २० ते २५ मिनिटांत पुराचे पाणी सखल भागात पोहोचू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी धावपळ सुरू झाली असून, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांकडून माईकद्वारे नागरिकांना सतर्क केले जात आहे. त्रिशूली नदीच्या काठावरील घरे आणि दुकाने तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वरच्या भागात हिमनदी फुटणे किंवा मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाणे यामुळे नदीची पाणीपातळी अचानक वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही धोका न पत्करता उंच आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.नुवाकोट परिसराला यापूर्वीच भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक रस्ते आणि पूल मोठ्या प्रमाणात खराब झाले असून, त्यातून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अशा वेळी पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यास नुकसान वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, चिनी सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, ग्यिरोंग बॉर्डर पोर्टच्या वरच्या भागात तयार झालेला कृत्रिम तलाव आता ओव्हरफ्लो होऊ लागला आहे. हा तलाव फुटल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अचानक खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन नेपाळी लष्कराने पुढील काही तासांसाठी बचावकार्य पूर्णपणे स्थगित केले आहे.तलावातून अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यास नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेपाळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून नदीच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यासाठी बचाव पथके प्रयत्नशील असून, आधीच्या महापुराच्या जखमा ताज्या असतानाच समोर आलेल्या या नव्या संकटामुळे नेपाळमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.