अनिल कांबळे
नागपूर,
police personnel raped नागपूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने २६ वर्षीय विधवा महिलेला पिस्तूल दाखवून लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्याशी शारीरिक संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे नागपूर ग्रामीण पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. अजय सलामे असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय सलामे हा गेल्या काही वर्षांपासून अंगरक्षक पोलिस कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावतो आहे. दोन वर्षांपूर्वी पोलिस कर्मचारी अजयची पीडित २६ वर्षीय विधवा महिलेशी ओळख झाली. तिला पतीपासून दोन मुली आहेत. त्यानंतर तो तिच्या सतत संपर्कात राहू लागला. विवाहित असल्याची माहिती असतानाही त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. निराधार असलेल्या आणि जोडीदाराच्या शोधात असलेल्या महिलेने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवताना चोरून मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महिलेने अजयकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र, अजय लग्नास टाळाटाळ करू लागला. तीन दिवसांपूर्वी महिलेने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे. पीडित महिलेने थेट पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोद्दार यांनी पोलिक कर्मचारी सलामेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रामटेक पोलिसांनी अजय सलामे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
.......... रक्षकच बनला भक्षक--------
अंगावर खाकी वर्दी चढवून रक्षणाची जबाबदारीची शपथ घेणाऱ्या पोलिस कर्मचारी अजय सलामे याने पिस्तूलाचा धाक दाखवून एका विधवेवर बलात्कार केला. त्यामुळेच रक्षकच भक्षक बनल्याचे चित्र निर्माण झाले. पोलिस कर्मचाऱ्याच्या या कृत्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच अजय सलामे पसार झाला असून रामटेक पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात एका महिलेची भूमिका संशयास्पद असल्याची माहितीही पोलिसांकडून समोर आली आहे.