साहिल-समीरा ISIच्या जाळ्यात!

दिल्लीतील जोडप्याचा कथित गुप्तहेर नेटवर्कशी संबंध

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
sahil and samira caught in the isis web पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या गुप्तहेर नेटवर्कप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोहम्मद साहिल आणि त्याची पत्नी समीरा या तरुण जोडप्याला अटक केली आहे. दोघे २०२४ पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपासानुसार, २०२४ ते २०२५ या काळात त्यांनी दुबईमार्गे पाकिस्तानला ८ भारतीय सिम कार्ड पाठवली आणि त्याबदल्यात अंदाजे ३० हजार रुपये घेतले. पाकिस्तानात या सिम कार्डच्या माध्यमातून व्हॉट्सॲप खाती चालवून भारतीय व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रवेश करण्याचा आणि संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
 
crime
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिलचा २०२४ मध्ये इंस्टाग्रामवरून एका पाकिस्तानी एजंटशी संपर्क झाला. हा संपर्क त्याची मैत्रीण समीरा हिच्यामार्फत झाल्यानंतर दोघांनी विवाह केला. पुढे त्यांची ओळख पाकिस्तानस्थित कथित माहिती अधिकाऱ्याशी (PIO) करून देण्यात आली आणि आर्थिक लाभाचे आश्वासन देत त्यांना या नेटवर्कमध्ये सहभागी करून घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. देशभरातील छावणी क्षेत्रांवर नजर ठेवण्यासाठी व्यक्ती तयार करणे आणि त्यांची भरती करण्याची जबाबदारी साहिलवर सोपवण्यात आल्याचेही तपास यंत्रणांनी म्हटले आहे. साहिलच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासात पाकिस्तानी हँडलर्ससोबतचे संशयास्पद चॅट्स आणि संभाषणे आढळल्यानंतर समिरापर्यंत तपास पोहोचला. तिच्या मोबाईलमध्येही साहिल, समीरा आणि पाकिस्तानातील कथित हँडलर्समधील संभाषणे व व्हॉट्सॲप चॅट्स आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अलीकडेच आयएसआय-समर्थित आंतरराज्यीय दहशतवादी आणि शस्त्र तस्करी नेटवर्कविरोधात कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती. दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानस्थित आयएसआय हँडलर शहजाद भट्टीच्या निर्देशानुसार आखला जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. साहिल आणि समिराच्या प्रकरणात आता पाकिस्तानी हँडलर्स, सिम कार्ड पुरवठा साखळी आणि कथित गुप्तहेर नेटवर्कमधील इतर व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.