सप्टेंबरमध्ये टीम इंडिया फुल्ल ऑन!

टी-२०, वनडे आणि आशियाई स्पर्धेत रंगणार सामने

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
मुंबई,
team india in full swing in september श्रीलंका दौऱ्याची सांगता झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता पुढील मालिकांकडे लागले आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवला, तर कोलंबोमधील दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे मालिकेत क्लीन स्वीपची संधी हुकली असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर कायम आहे. आता सप्टेंबरमध्ये भारतीय संघाला टी-२०, वनडे तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामन्यांमुळे व्यस्त वेळापत्रकाचा सामना करावा लागणार आहे.
 
team india
 
श्रीलंकेनंतर भारताची पहिली लढत अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार असून तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगतील. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर २०२६ रोजी, दुसरा सामना १५ सप्टेंबरला, तर तिसरा सामना १७ सप्टेंबरला होईल. तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार रात्री ७ वाजता सुरू होणार आहेत. त्यामुळे १३ सप्टेंबरपासून टीम इंडियाच्या सप्टेंबरमधील क्रिकेट मोहिमेला सुरुवात होईल.
 
अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका संपल्यानंतर भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून पहिला सामना २७ सप्टेंबरला तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर ३० सप्टेंबरला गुवाहाटीतील डॉ. भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियमवर दुसरा सामना होईल. मालिकेतील अखेरचा आणि तिसरा वनडे ३ ऑक्टोबरला न्यू चंदीगडमधील पीसीए स्टेडियमवर होणार आहे.
 
याच काळात भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतही आपले आव्हान मांडणार आहे. भारताला या स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. २८ सप्टेंबर रोजी निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये भारताचा क्वार्टर फायनल सामना होणार आहे. मात्र, या लढतीत भारतासमोर कोणता संघ असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. भारताने उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवल्यास १ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागेल. त्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांना सलग सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान यामुळे टीम इंडियाचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त राहणार आहे.