अनिल कांबळे
नागपूर,
women attempt suicide अंबाझरी पोलिसांची सतर्कता आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे बुधवारी अवघ्या चार तासांत तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांचे प्राण वाचविण्यात यश आले. यामध्ये १६ वर्षीय मुलीसह ७० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. तिन्ही महिलांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
पहिली घटना पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास फुटाळा तलाव परिसरात घडली. गोधनी येथील २४ वर्षीय महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तलावाच्या काठावर पोहोचली होती. ती पाण्यात उडी घेण्याच्या तयारीत असतानाच एका सतर्क युवकाने तिला पकडून रोखले आणि पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला सुरक्षितपणे तेथून बाहेर काढले. वैयक्तिक कारणांमुळे त्रस्त असलेली ही महिला वारंवार आत्महत्या करण्याची भाषा करीत होती. पोलिसांनी तिची समजूत काढून तिला शांत केले. यानंतर सुमारे तीन तासांनी सकाळी ८.४५ वाजता सीताबर्डी परिसरातील १६ वर्षीय मुलीने अंबाझरी तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला सुरक्षित बाहेर काढले. तिला आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली.
या घटनेनंतर अवघ्या २० मिनिटांनी एका ७० वर्षीय महिलेनेही अंबाझरी तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक, पोहणारे युवक तसेच गोताखोरांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेलाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.women attempt suicide अवघ्या चार तासांत घडलेल्या या तीन घटनांमध्ये पोलिसांची तत्परता आणि नागरिकांची सजगता निर्णायक ठरली. वेळीच मदत मिळाल्याने तिन्ही महिलांचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला.
..........
आयपीएस विनीता एस. यांनी केला सत्कार
नागपूर आयुक्तालयाच्या अप्पर पोलिस आयुक्त विनीता एस. यांनी महिलांचे प्राण वाचविणारे तरुण, पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. त्यांच्या कार्याचे कौतूक करीत त्यांना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.