मुंबई,
toxics यश अभिनित ‘टॉक्सिक : ए फेयरी टेल फॉर ग्रोन अप्स’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट नोंदवण्यात आली. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटाने बुधवारच्या पहिल्या दिवसाच्या 101.10 कोटी रुपयांच्या कमाईनंतर गुरुवारी, 27 ऑगस्ट 2026 रोजी भारतात 37.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यामुळे दोन दिवसांत चित्रपटाचे देशांतर्गत नेट कलेक्शन 138.75 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
सैकनिल्कच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी ‘टॉक्सिक’चे 22,629 शो झाले आणि त्यामध्ये सुमारे 26.6 टक्के ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवसाच्या कमाईत तब्बल 62.8 टक्क्यांची घट झाली. भारतातील चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन आता 165.85 कोटी रुपये झाले आहे. विशेष म्हणजे, यशचा हा चित्रपट कन्नडपेक्षा हिंदी भाषेतील प्रेक्षकांकडून अधिक प्रतिसाद मिळवत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.