नागपूर,
Transgender Aanchalties Rakhi to Sandeep Joshi रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर सामाजिक सलोखा, आपुलकी आणि माणुसकीचा सुंदर संदेश देणारा भावनिक प्रसंग नागपुरात घडला. सामाजिक कार्यकर्त्या, ‘महाराष्ट्र ब्युटी क्वीन’ आणि ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी देशभर कार्यरत असलेल्या ट्रान्सजेंडर आंचल वर्मा यांनी माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांच्या घरी भेट देत त्यांना जिव्हाळ्याने राखी बांधली.आंचल वर्मा या सध्या नागपुरातील चर्चेत असलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असून, LGBTQA+ समुदायाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र ब्युटी क्वीन’ म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘कायांतर’ ही कादंबरी राज्यभर गाजली असून, गुजरातमधील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा येथील अभ्यासक्रमातही तिचा समावेश करण्यात आला आहे.
‘कायांतर’ या कादंबरीतून आंचल वर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. अशा व्यक्तिमत्त्वाने रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला भाऊ मानून राखी बांधणे, हा आयुष्यातील अत्यंत मोठा सन्मान असल्याची भावना संदीप जोशी यांनी व्यक्त केली.आंचल वर्मा यांनी संदीप जोशी यांच्या मनगटावर राखी बांधत केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा धागाच बांधला नाही, तर या माध्यमातून संपूर्ण ट्रान्सजेंडर समुदायाशी आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. हे भाऊ-बहिणीचे नाते आयुष्यभर जपण्याचे वचन आंचल यांनी दिले. यावेळी संदीप जोशी यांनीही ट्रान्सजेंडर समुदायाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असून, ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘आंचलसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व मला आपला भाऊ मानून राखी बांधते, ही केवळ भावनिक गोष्ट नाही; हा माझ्यासाठी आयुष्यातील मोठा सन्मान आणि अत्यंत मौल्यवान भेट आहे. आज बांधलेला हा राखीचा धागा केवळ मनगटावर नाही, तर मनावर बांधलेला आहे,’ अशी भावना संदीप जोशी यांनी व्यक्त केली. ‘या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि या सुंदर नात्यासाठी आंचल यांचे मनापासून आभार,’ असेही त्यांनी म्हटले.
‘सोबत’च्या भगिनींसह भाजपा परिवारातील बहिणींचीही राखी
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पातील भगिनी तसेच भाजपा परिवारातील बहिणींनी माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. या निमित्ताने प्रेम, विश्वास, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले. ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाशी जोडलेल्या भगिनी आणि भाजपा परिवारातील बहिणींनी संदीप जोशी यांच्या हातावर राखी बांधत आपल्या भावनांची अभिव्यक्ती केली. मनगटावर बांधलेला हा राखीचा धागा केवळ सणाचा भाग नसून, परस्पर विश्वास, जिव्हाळा आणि भावाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा धागा असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. ‘सोबत’ प्रकल्पातील भगिनींसह भाजपा परिवारातील प्रत्येक बहिणीच्या सुख-दुःखात सदैव पाठीशी उभे राहण्याचे आणि हे प्रेमाचे नाते आयुष्यभर जपण्याचे वचन संदीप जोशी यांनी यावेळी दिले.