श्रीनगरमधून फरार दोन कैदी राजस्थानात सापडले

गावकऱ्यांच्या सतर्कतेने अटक

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
श्रीनगर,
two prisoners escape from srinagar जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या उच्च सुरक्षा असलेल्या मध्यवर्ती कारागृहातून २३ ऑगस्ट रोजी फरार झालेले दोन विचाराधीन कैदी अखेर राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील राजगड येथे पोलिसांच्या हाती लागले. शेतात रात्री झोपलेल्या अवस्थेत असताना गावकऱ्यांना त्यांची हालचाल संशयास्पद वाटली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही ताब्यात घेतले.
 
two prisoners escape from srinagar
 
पोलिसांच्या माहितीनुसार, फरमान हा राजगडचा रहिवासी असून मुख्तार गुज्जर हा जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे. दोघेही श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात पॉक्सो आणि बलात्काराच्या आरोपांखाली न्यायालयीन कोठडीत होते. तुरुंगात असताना त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर दोघांनी पलायनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान त्यांनी दोरी आणि खांबाची व्यवस्था केली होती. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता तुरुंगाची भिंत ओलांडून दोघे फरार झाले.
 
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर दोघांनी जम्मू-काश्मीरमधून राजस्थानच्या दिशेने पलायन केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका महिलेकडून ८,००० रुपये लुटल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अखेर २६ ऑगस्ट रोजी राजगड परिसरातील एका शेतात दोन संशयित व्यक्ती झोपल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. ते चोर असावेत, असा संशय गावकऱ्यांना होता. माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातून पथक शेतात पोहोचले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांची ओळख पटली. सुरुवातीला त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली. पुढील चौकशीत ते श्रीनगरच्या उच्च सुरक्षा कारागृहातून फरार झालेले कैदी असल्याचे स्पष्ट झाले. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या संदेशानेही या माहितीला दुजोरा मिळाला.