कोको गॉफची ‘अमेरिकन ओपन’कडे वाटचाल
दिनांक :28-Aug-2026
Total Views |
न्यू यॉर्क
us-open सिनसिनाटी ओपनमध्ये या हंगामातील पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर अमेरिकेची किशोरवयीन टेनिसपटू कोको गॉफ आता न्यू यॉर्कमधील ‘अमेरिकन ओपन’मध्येही आपली विजयाची लय कायम राखण्याच्या व तिसरे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने कोर्टवर उतरणार आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या कोकोला यावर्षी जेतेपदाची तीव्र इच्छा होती, कारण याआधी अनेकदा ती जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मियामी आणि रोममधील स्पर्धांच्या अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला होता, तसेच विम्बल्डन आणि टोरंटोमध्ये ती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती; अखेरीस सिनसिनाटी स्पर्धेत तिने आपल्याच देशाच्या जेसिका पेगुलाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. अमेरिकन ओपनसाठी सज्ज होताना गॉफला सिनसिनाटीतील त्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल.
न्यू यॉर्कमधील स्पर्धा आव्हानात्मक असेल. मात्र, या आठवड्यात मी मिळवलेले दर्जेदार विजय, माझा सर्वोत्तम खेळ होत नसतानाही परिस्थिती सावरून विजय मिळविण्याची क्षमता व त्याच वेळी या आठवड्यात मी ज्या उत्कृष्ट दर्जाचा टेनिस खेळले तो खेळ पुन्हा करण्याची खात्री, या गोष्टींचा मला नक्कीच आधार वाटतो, असे कोको म्हणाली.