वैभव सूर्यवंशी अंडर-१९ संघाबाहेर!

BCCI च्या नियमामुळे निवड नाही

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
vaibhav suryavanshi भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने भारतासाठी आतापर्यंत सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंग्लंडमध्ये त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी १९ वर्षांखालील मालिकेसाठी त्याच्या नावाचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय यांना संघात स्थान मिळाले आहे.
 
vaibhav suryavanshi
 
वैभवला संघाबाहेर ठेवण्यामागे त्याचा फॉर्म किंवा वय कारणीभूत नसून बीसीसीआयचा २०१६ पासून लागू असलेला नियम महत्त्वाचा आहे. या नियमानुसार, एखाद्या क्रिकेटपटूला त्याच्या कारकिर्दीत केवळ एकदाच १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे एखादा खेळाडू १५ किंवा १७ वर्षांचा असतानाच अंडर-१९ विश्वचषकात सहभागी झाला, तर पुढील विश्वचषकापूर्वी त्याचे वय १९ वर्षांपेक्षा कमी असले तरी त्याला पुन्हा त्या स्पर्धेत खेळता येत नाही. याच नियमामुळे वॉशिंग्टन सुंदरला २०१८ च्या अंडर-१९ विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
 
वैभव सूर्यवंशी २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकात भारताकडून खेळला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला पुन्हा अंडर-१९ विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. परिणामी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर-१९ मालिकेसाठी निवड समितीने त्याचा विचार केलेला नाही. त्याचबरोबर या निर्णयामुळे इतर नव्या खेळाडूंना अंडर-१९ स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे.ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ १८ सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत १८, २१ आणि २३ सप्टेंबर रोजी राजकोट येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर दोन बहुदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला सामना २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान राजकोटमध्ये, तर दुसरा सामना ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘बी’ मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १५ सदस्यीय एकदिवसीय संघात लेग-स्पिन अष्टपैलू आर्यवीर सेहवाग आणि यष्टीरक्षक-फलंदाज अन्वय द्रविड यांची निवड झाली आहे. मात्र, दोघांनाही दोन बहुदिवसीय सामन्यांच्या संघात स्थान मिळालेले नाही. आर्यवीर सध्या २०२६ च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळत असून त्याने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. अंडर-१९ एकदिवसीय संघात त्याची ही पहिलीच निवड आहे. दुसरीकडे, अन्वय द्रविड यापूर्वीही भारतीय अंडर-१९ संघाचा भाग राहिला आहे.