अग्रलेख
havoc in the himalayas चीनचे नियंत्रण असलेल्या तिबेटमधून वाहत येणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या प्रलयंकारी महापुराने हिमालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या उणिवा पुन्हा एकदा उघड केल्या आहेत. अनपेक्षितपणे आलेल्या या विध्वंसक महापुराने आसपासचे सारे रस्ते कवेत घेतले, शाळा बुडाल्या, असंख्य पर्यटक मृत्युमुखी पडले, अनेक जण बेपत्ता झाले. २६ ऑगस्टला या नदीच्या विक्राळ प्रवाहाने दगडमातीचे जीवघेणे रूप धारण करून मानवी आयुष्यावर संतप्त आक्रमण केले. सुरुवातीस हे संकट भूकंप किंवा अतिवृष्टीमुळे ओढवल्याची शंका व्यक्त झाली, पण नंतर उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या विश्लेषणातून एका जुन्या भीतीला पुष्टी मिळाली. हिमनदीचा बर्फ वितळून आणि हिमनग कोसळून नदीचा प्रवाह काही काळ अडला; तात्पुरते जलाशय निर्माण झाले आणि त्यातील अमर्याद पाण्याच्या साठ्यांनी मिळेल ती वाट शोधून आक्रमक हल्ला सुरू केला. म्हणजे, अतिवृष्टीमुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली, महापुरासारखी स्थिती निर्माण झाली आणि पुराच्या लोंढ्याने नदीपात्राच्या सीमा ओलांडल्या.
अलिकडच्या काही दशकांत हिमालयाची नैसर्गिक प्रवृत्ती बदलत असल्याचा आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी विध्वंसक हाहाकार माजण्याचा इशारा वारंवार दिला जात होता. या दुर्दैवी दुर्घटनेने हा इशारा वास्तवात आणला आहे. हिमालयाच्या बदलत्या स्वभावाचा हा इशारा महापुराच्या रूपाने नैसर्गिक प्रक्रियेतून स्पष्ट झाला असला, तरी त्याला निसर्गाचा कोप किती कारणीभूत आणि मानवी दुर्लक्षाचे परिणाम किती कारणीभूत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अशी दुर्घटना घडणार असल्याची एक पूर्वसूचना चीनकडून मिळाली, पण त्याला विलंब झाल्याने जीवितहानी टाळण्याकरिता सावधगिरीच्या उपाययोजना आखण्यापुरता वेळ मिळाला नाही, असा आरोप केला जातो. चीनकडील जी उपग्रह छायाचित्रे नेपाळच्या संबंधित यंत्रणांना मिळाली होती, त्यानुसार नदीच्या सुमारे २० किलोमीटर पात्रात बर्फ आणि गाळाचे अडथळे तयार झाल्याचे दिसले होते. मात्र, ही माहिती मिळाली तेव्हा खूपच उशीर झाला होता, असे नेपाळच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. हा विलंब नेमका किती झाला आणि झालेल्या विध्वंसास तो किती कारणीभूत ठरला, याची स्वतंत्र चौकशी होईल, तेव्हा या बाबी आणि आरोपातील तथ्ये स्पष्ट होतीलच; तरीही या आपत्तींनंतर सार्वत्रिक आत्मपरीक्षण करण्याची गरज मात्र सर्वत्र अधोरेखित झाली आहे. कदाचित अशी माहिती पुरेशा वेळेवर मिळाली असती, तर आज दिसणारी विध्वंसक हानी कमी करता आली असती. अचानक कोसळणारे हिमकडे आणि हिमनदीच्या प्रवाहातील मोठे खडक थांबविणे माणसाच्या हातात नाही. अशा घटनांमध्ये पूर्वसूचनेची उपलब्ध वेळ काही वेळा अत्यंत कमी असते. नदीचा महापूर थांबवता येत नसला, तरी नदीकाठची माणसे काही मिनिटे आधी सुरक्षित स्थळी पोहोचवता येऊ शकतात. पूल बंद करता येतात. वाहतूक थांबवता येते. पर्यटकांना आणि यात्रेकरूंना धोकादायक मार्गावर जाण्यापासून रोखता येते. वीज प्रकल्पांतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढता येते. आपत्कालीन यंत्रणा सज्ज करता येते. म्हणूनच अशा आपत्तींची पूर्वसूचना मिळाली तरी ती आपत्ती रोखण्याचे साधन ठरत नाही. कदाचित जीवितहानी आणि वित्त-मालमत्तांची हानी कमी करणे शक्य झाले असते, पण आता अशा शक्यता भोटेकोशी नदीच्या प्रलयंकारी पुरासोबत वाहून गेल्या आहेत.
आज नेपाळचे जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. जगभरातील अनेक देशांच्या पर्यटकांचा या संकटाने घास घेतला आहे. नेपाळसाठी हे काही नवे संकट नाही. इतिहासाने या आणि अशा संकटांचे इशारे याआधी अनेकदा दिलेले आहेत. १९८५ मधील दिग त्शो हिमनदी तलाव फुटण्याची घटना आजही हिमालयीन आपत्ती व्यवस्थापनाच्या इतिहासातील महत्त्वाचे उदाहरण मानली जाते. १९९८ मध्ये ताम पोखरी तलाव फुटला. या दोन्ही घटनांनी हिमनदीतील तलाव किती वेगाने विनाशकारी पूर निर्माण करू शकतात, हे दाखवून दिले होते. याच भोटेकोशी नदीला गेल्या वर्षी असाच महापूर आला होता आणि तिबेट-नेपाळ सीमेवर हिमनदीतील तलाव फुटल्यामुळेच हाहाकार उडाला होता, हे उपग्रह विश्लेषणातून समोर आले होते. म्हणजे, अशा घटनांच्या धोक्याची घंटा नेपाळच्या डोक्यावर सतत घणघणत होती.havoc in the himalayas त्यामुळे आताची घटना अनपेक्षित होती असे नाही. याच भौगोलिक परिसराने याआधीच धोक्याची घंटा वाजवली होती.
निसर्ग कधीही अनपेक्षितपणे कोणावरही घाला घालत नाही, कोणाच्याही जगण्याचा हक्क अकारण हिरावून घेत नाही असे म्हणतात. या घटनेआधी घडलेल्या अशाच दुर्घटनांतून निसर्गाने पुरेसे इशारे मानवास दिले होते. त्यामुळे अशा इशाऱ्यांनंतर माणसांचे जग सावध झाले का, त्याने निसर्गाच्या इशाऱ्याला प्रतिसाद दिला का, हा प्रश्न आता ठळक झाला आहे आणि केवळ नेपाळ, तिबेट अथवा चीनने नव्हे, तर हिमालयाच्या क्षेत्रातील सर्वच प्रदेशांनी हा प्रश्न स्वतःस विचारला पाहिजे. कारण, आपत्तींना रोखण्यासाठी नद्यांच्या सीमा अपुऱ्या असतात. या भोटेकोशी नदीचा उगम तिबेटमध्ये झाला असला, तरी तिचा विनाशकारी प्रवास नेपाळमध्येच होत राहिला आहे. अशाच प्रकारे हिमालयातील अनेक नद्यांचे पाणी भारतातही येत असते. त्यामुळे एका देशात घडणारी हिमप्रलयाची दुर्घटना दुसऱ्या देशातही होऊ शकते आणि त्यामुळे आपत्तींचे कडे मानवी जीवनावर कोसळू शकतात, याचा हा इशारा आहे. अशा आपत्तींना राजनैतिक संबंध, वाटाघाटी, वाटपाची हिस्सेदारी, सीमा ओलांडण्याचे परवाने आदी मानवी नियंत्रणांची बंधने आळा घालू शकत नाहीत? माहितीची देवणघेवाण, राजनैतिक संबंध, प्रशासकीय संपर्क आदी बाबी आपत्तींच्या वेगाशी स्पर्धाही करू शकत नाहीत. हिमनदीवर राजनैतिक बंधनांची गरज नसते, भूस्खलनाला सीमांवरील चौक्यांच्या तपासणीस सामोरे जाण्याची गरज नसते आणि नदीला एका देशातून दुसऱ्या देशात वाहत जाण्यासाठी परवान्यांची गरज नसते. त्यामुळे हिमालयाच्या क्षेत्रातील बदलत्या वातावरणीय स्थितीचा सातत्याने अभ्यास करणे, आढावा घेणे आणि त्या त्या क्षणी होणाऱ्या बदलाच्या विश्लेषणानुसार आवश्यक तेथे माघार घेऊनच स्वतःस सुरक्षित ठेवणे हाच अशा दुर्दैवी घटनांवरील उपाय ठरतो. अशा अभ्यासाकरिता हिमालयात पुरेशी हवामान संशोधन केंद्रे, हिमनद्यांच्या प्रवाहांचे उपग्रहांद्वारे सातत्यपूर्ण निरीक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्राद्वारे धोका ओळखणारी यंत्रणा या सर्वांची साखळी या प्रदेशात उभी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी या क्षेत्राच्या सावलीतील सर्व देशांनी परस्परांशी समन्वय ठेवण्याची आणि अशा यंत्रणांना एकत्र जोडण्याचीही गरज आहे. धोक्याचे संकेत तिबेटमध्ये दिसले तर ते तातडीने नेपाळला मिळाले पाहिजेत आणि नेपाळमध्ये धोका वाढला तर भारताला त्याची वेगवान माहिती मिळाली पाहिजे. संदेशांची अशी साखळी असेल, तरच हिमालयाच्या इशाऱ्यांचा आदर केल्यासारखे होईल. हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास अशा आधुनिक समस्यादेखील अशा दुर्घटनांस कारणीभूत आहेत. वाढत्या तापमानामुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत, हिमकडे कोसळू लागले आहेत आणि महापुरासारखी संकटे अधिक जीवघेणी होऊ लागली आहेत. म्हणजे अतिवृष्टी झाली तरच नद्यांना महापूर येतात ही संकल्पना हिमालयीन परिसरापुरती गैरलागू ठरली आहे. पण नेपाळसाठी तेवढे पुरेसे नाही. सीमा ओलांडून येणाऱ्या अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी नेपाळची यंत्रणा पुरेशी सक्षम असेलच, असे दिसत नाही. त्यामुळे एकट्या नेपाळवरच विसंबून न राहता अशा आपत्ती ज्यांना कवेत घेऊ शकतात, त्या सर्वांनी सहकार्याच्या भावनेने परस्परांस हात देण्याची गरज आहे. भारताने असा हात सदैव पुढे केलेला आहे. कारण हिमालयीन आपत्ती ही केवळ कोणत्याही एका देशाची अंतर्गत बाब राहिलेली नाही. निसर्गाने तसा इशारा वारंवार दिला आहे. हिमनद्यांचे प्रवाह बदलतात, बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढते, बर्फाचे कडे कोसळू लागतात, भूस्खलनाचे संकट गडद होते, तेव्हा अशा प्रत्येक संकेताकडे निसर्गाची पूर्वसूचना म्हणून पाहिले गेले पाहिजे. ही प्रक्रिया राजनैतिक सीमांवर अडकून राहिली, तर तंत्रज्ञानाचा आवाका निरर्थकच होऊन जाईल आणि केवळ हतबलपणे संकटांसमोर गुडघे टेकत राहावे लागेल.