गोंदिया
gondia-crime कॉलर पकडल्याच्या रागातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना शहरातील अंगूर बगीचा परिसरातील एकदंत कॉलनी येथे २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिथून भैयालाल ठाकरे (३२) रा. नवाटोला, नागरा असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी संशयित आरोपी संदीप देवदास मेश्राम रा. कटांगी कला यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मिथून ठाकरे हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत अंगूर बगीचा परिसरातील एकदंत कॉलनी येथे गेला. त्यावेळी त्याचा संदीप मेश्राम याच्याशी वाद झाल्याने त्याने संदीपची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या घटनेनंतर दोघांमधील वाद अधिकच चिघळला. धक्काबुक्कीचा राग मनात धरून संदीपने धारदार शस्त्राने मिथूनवर हल्ला केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मिथूनचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिस करीत आहेत.