काठमांडू,
626 deaths in Nepal नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, मृतांचा आकडा ६२६ वर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या आपत्तीनंतर २,००० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, नेपाळच्या सीमेलगत तिबेटमध्येही नव्या संकटाची शक्यता निर्माण झाली असून, चीनने नदी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वृत्तानुसार, नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीत मृतांचा आकडा ६२६ असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी हा आकडा ५७९ इतका होता. मात्र, सकाळी १० वाजण्यापूर्वीच्या अद्ययावत माहितीनुसार पोलिसांनी मृतांचा आकडा ६१६ असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आकडेवारीत काहीशी तफावत निर्माण झाली आहे. दुसरीकडे, चीनच्या सरकारी माध्यमांनी तिबेटमध्ये सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हे आकडे एकत्र केल्यास मृतांची संख्या किमान ६२३ इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळ-तिबेट सीमेवरील ग्यिरोंग बंदराच्या आसपासही बचावकार्य मोठ्या सावधगिरीने सुरू आहे. भूस्खलनाच्या ढिगाऱ्यामुळे तयार झालेल्या तलावातील पाण्याची पातळी पुन्हा वाढत असल्याचे चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे आणखी एक मोठे चिखल किंवा भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बचाव पथकांनी उतारांच्या परिसरात ड्रोन तैनात केले असून, निरीक्षण केंद्रेही उभारण्यात आली आहेत. जवळच्या भागात काम करणाऱ्या बचाव कर्मचाऱ्यांना धोका वाढल्यास तातडीने सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चीनने नेपाळला पाठवलेल्या संदेशातून ल्हेंडे नदी प्रणालीच्या वरच्या भागात तयार झालेल्या तलावाबाबत गंभीर इशारा दिला आहे. या तलावातील पाण्याचा रंग हळूहळू अधिक गडद होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. चीनच्या मते, पाण्याच्या रंगातील हा बदल तलाव फुटण्याच्या संभाव्य धोक्याचा संकेत असू शकतो. त्यामुळे हे सरोवर कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, तलाव फुटल्यास नदीतील पाण्याचा प्रवाह किती वाढेल, याबाबत चीनने काहीसा दिलासा देणारा अंदाजही व्यक्त केला आहे. तलावातील पाण्याचे प्रमाण फार मोठे नसल्याने नदीच्या खालच्या भागात पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात वाढू शकतो; मात्र तो लक्षणीय पातळीवर जाण्याची शक्यता नसल्याचे चीनने म्हटले आहे. तरीही नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला चिनी अधिकाऱ्यांनी दिला आहे. हिमनदी कोसळल्यामुळे तयार झालेल्या या तलावामुळे धोका वाढला आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर आता नव्या भूस्खलनाची आणि तलाव फुटण्याची शक्यता प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.