मुंबई
ankit baliyan murder case अंकित बालियान हत्याकांडाच्या तपासाची व्याप्ती आता केवळ शूटरचा शोध घेण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हत्येचे धागे हरियाणाशी जोडले जात असल्याचे संकेत मिळाल्यानंतर पोलिस आणि एसटीएफने गँगवॉरच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर अंकितशी संबंधित विविध पैलूंचीही चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनीपत आणि रोहतकमधून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
दरम्यान, अंकित बालियानच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरियाणवी गायक भूपेंद्र ढींगरा यांच्या नावाच्या कथित इन्स्टाग्राम खात्यावर अंकितच्या हत्येसंदर्भात आणखी चार पोस्ट आणि व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. यातील एका गाण्याचे चित्रणही करण्यात आले असून, त्यात एका युवकाची मान मुरडून हत्या करताना दाखवण्यात आले आहे. मात्र, या व्हिडिओची पुष्टी करण्यात आलेली नाही. याच्या एक दिवस आधी याच गायकाचा व्हिडिओ व्हायरल करून अंकित बालियानच्या हत्येची कथित जबाबदारी स्वीकारण्यात आली होती.
हल्लेखोरांनी अंकितवर सुमारे २५ राउंड फायरिंग केल्याची माहिती असून, त्यातील नऊ गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजला तपासातील महत्त्वाचा आधार मानले असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासोबतच त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांची पडताळणी वेगाने सुरू केली आहे. अंकितच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टमपूर्वी करण्यात आलेल्या एक्स-रे आणि सीटी स्कॅनमध्ये शरीरात घुसलेल्या तसेच आरपार झालेल्या गोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी घटनास्थळाचे सीन रीकिएशनही केले.
अंकित बालियान दीर्घकाळ सोनीपत आणि रोहतक येथे राहिला होता. त्यामुळे हरियाणवी संगीत उद्योगात काम करताना त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहितीही तपास पथकाकडून गोळा केली जात आहे. त्याचबरोबर विविध गँगशी असलेल्या संभाव्य कनेक्शनवरही पोलिसांची नजर आहे. गोगी गँगच्या कनेक्शनच्या तपासादरम्यान लॉरेन्स बिश्नोई, काला जठेडी, नीरज बवाना, हिमांशु भाऊ, कपिल सांगवान उर्फ नंदू आणि रोहित गोदारा यांच्याशी संबंधित नेटवर्कचा इतिहासही तपासला जात आहे.
दरम्यान, अंकितच्या हत्येनंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी चर्चेत आलेले ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ हे गाणे पुन्हा चर्चेत आले आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अंकितला धमकी मिळाल्याचे त्याची पत्नी सीमा यांनी सांगितले आहे. त्यामुळे या जुन्या धमकीचा आणि सध्याच्या हत्याकांडाचा काही संबंध आहे का, याचाही तपास यंत्रणांकडून केला जात आहे.
अंकित बालियान हत्याकांडातील शूटर कोण, हत्येमागील नेमका उद्देश काय आणि या प्रकरणामागे कोणते गँग नेटवर्क कार्यरत आहे, याचा उलगडा करण्यासाठी पोलिस आणि एसटीएफचा तपास आता अधिक व्यापक झाला आहे. मात्र, संशयितांची चौकशी सुरू असली तरी ठोस पुरावे समोर येणे अद्याप बाकी आहे.