अनिल कांबळे
नागपूर,
suspicion of illicit relationship अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना पारडी परिसरात गुरुवारी सकाळी घडली. शेजाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने २४ वर्षीय महिलेचे प्राण थोडक्यात वाचले. या प्रकरणातील आरोपी पती सूरज प्रभुनाथ तिवारी (२४, रा. ओमनगर, तलमले ले-आउट, कळमना) हा घटनेनंतर फरार झाला होता.

पीडित महिला खुशबू सुरज तिवारी ही गृहिणी असून ती पुनापूर परिसरात आई-वडिलांसोबत राहत होती. पतीकडून वारंवार होणारा मानसिक व शारीरिक छळ सहन न झाल्याने ती काही दिवसांपासून माहेरी राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज हा बेरोजगार असून त्याला दारूचे व्यसन असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तो पत्नीला वारंवार मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरज पत्नीच्या माहेरी पोहोचला. त्याने खुशबूवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत तिच्याशी वाद घातला आणि तिला आपल्यासोबत परत येण्याची मागणी केली. घरातून निघताना त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सुरज पुन्हा दुचाकीवरून पत्नीच्या माहेरी आला. त्याने खुशबूला शिवीगाळ करून धमकावले. त्यानंतर दुचाकीतून पेट्रोल काढून एका बाटलीत भरले आणि पत्नीला जिवंत जाळण्याची धमकी दिली. आरोपीने खुशबूचे केस पकडून तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडीपेटीतील काडी पेटविण्याचा प्रयत्न केला.suspicion of illicit relationship मात्र, आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी सुरजला रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा विरोध वाढताच आरोपी तेथून पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत जखमी झालेल्या खुशबूला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय तपासणीच्या आधारे पारडी पोलिसांनी सुरजविरुद्ध हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस तपासात सुरजविरुद्ध यापूर्वीही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. २०२० मध्ये यशोधरानगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.