मुंबई
bandhu marathi movie प्रभू श्रीरामांसाठी लक्ष्मण हे केवळ भाऊ नव्हते, तर विश्वास, कर्तव्य आणि आयुष्यभराच्या साथीचा भक्कम आधार होते. भावा-भावामधील नात्याची हीच न बोलता जाणवणारी ऊब, संकटाच्या काळात खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची ताकद आणि सुख-दुःखात कायम साथ देण्याचे वचन आता ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. दोन भावांच्या अतूट बंधाची आणि नात्यांच्या कसोटीची हृदयस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ येत्या २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मराठी तसेच भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि नामांकित इफ्फी विजेते जितेंद्र जोशी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. आपल्या सहज, वास्तववादी आणि प्रभावी अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी ‘बंधू’मधून एका वेगळ्या आणि भावनिक नात्याची कहाणी साकारताना दिसणार आहे.
हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन पिढ्यांचा वारसा पुढे नेणारे अभिनेता रजत बेदी यांनी ‘बंधू’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. आगामी ‘बंधू’ चित्रपटाचे ते प्रस्तुतकर्ते आहेत. रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ यांसारख्या यशस्वी, मनोरंजक तसेच आशयघन चित्रपटांमधून आपल्या दिग्दर्शनाची वेगळी छाप पाडणारे आणि भावनिक प्रसंगांची प्रभावी मांडणी करण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी ‘बंधू’च्या लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटाच्या संगीताची आणि पार्श्वसंगीताची धुरा विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे. भावनिक, मधुर आणि काळजाचा ठाव घेणारी त्यांची सुश्राव्य गाणी ‘बंधू’मधून प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या कथेला संगीताची भावनिक साथ लाभणार आहे.
एका छोट्याशा गावात घडणारी ‘बंधू’ची कथा दोन भावांच्या नात्याचा वेध घेताना प्रेक्षकांना कुठेतरी आपल्या घरातील, आपल्या भावाची आठवण करून देणारी ठरणार आहे. भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधील विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा या सगळ्यांचा वेध चित्रपट घेणार आहे.
प्रेम, संघर्ष, अहंकार, त्याग आणि भावनांची गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ही कथा केवळ पडद्यावरची न वाटता कुठेतरी आपल्या घरातलीच असल्याचा अनुभव देणारी आहे. नाती, भावना आणि संघर्षांचा हा भावनिक पट प्रेक्षकांना २० नोव्हेंबरपासून एका हृदयस्पर्शी प्रवासावर घेऊन जाण्यास सज्ज झाला आहे.