चांदूर बाजार
bablu-deshmukh कोणतीही सत्ता नसतानाही काँग्रेसचा कार्यकर्ता दगमगत नाही, तो आजही प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभा आहे. मला सत्तेच्या अनेक ऑफर होत्या; मात्र विचारधारा बदलणे मला मान्य नव्हते. निवडणुकीतील पराभवाने मी खचलेलो नसून, देशातील परिस्थिती बदलत आहे. भाजपच्या भूलथापांना आता जनता बळी पडणार नाही, असा विश्वास अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त शनिवारी चांदूर बाजार शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंत वानखडे होते. वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप, कोठारा लेप्रसी येथील कुष्ठरुग्णांसाठी भोजन तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर माधान रोडवरील रघुवंशी मंगल कार्यालयात बबलू देशमुख यांच्या अभिष्टचिंतन व नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माणसं घडविणारा नेता म्हणून बबलू देशमुख यांची ओळख असल्याचे खा. बळवंत वानखडे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून बबलू देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.