मुंबई
dahi handi 2026 महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी असून, ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरे रचताना अनेकदा अपघात होऊन गोविंदांना गंभीर दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोविंदांना प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार आहे. राज्यभरातील गोविंदांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.
दहीहंडीच्या दिवशी मानवी मनोरे रचताना दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने ही विशेष विमा योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व अधिकृत गोविंदा पथकांना घेता येणार आहे.
मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना झालेल्या नुकसानीच्या स्वरूपानुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे. गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अपघातात दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. एखाद्या दुर्घटनेत एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास संबंधित गोविंदाला ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
या विशेष विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदाचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित गोविंदा पथक किंवा मंडळाची अधिकृत नोंदणी झालेली असणे बंधनकारक आहे. दहीहंडीच्या दिवशी मानवी मनोरे रचताना आयोजक आणि गोविंदा पथकांनी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, मॅट्रेस यांसह आवश्यक सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी पथकातील सर्व सदस्यांची पूर्ण नावे, त्यांच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती जमा करावी लागणार आहे.
दहीहंडीच्या उत्साहात गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अपघाताच्या प्रसंगी गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळणार आहे. मात्र, विमा संरक्षणासोबतच दहीहंडीच्या वेळी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी आयोजक आणि गोविंदा पथकांवरही राहणार आहे.