अमरावती
mla-chitra-wagh जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीनंतर जे मुद्दे समाेर येत आहे, त्यातून ऐकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्राधान्याने दिसते. नेमके दोषी काेण हे पुढे आणायचे असेल तर सदर घटनेची स्वतंत्रपणे पोलिस चौकशी व्हायला, हवी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केली.

शनिववारी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार डाॅ. अनिल बोंडे, भाजपा जिलाध्यक्ष आमदार प्रताप अडसड, शहराध्यक्ष डाॅ. नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह अन्य हजर होते. तत्पूर्वी चित्रा वाघ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यांनी रुग्णालय प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि व्हेंटीलेटर कंपनीच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. या घटनेशी संबंधित असलेला प्रत्येक विभागाचा अधिकारी आपल्या सोयीनुसार माहिती देऊन उत्तर देत आहे. त्यामुळे कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे, हे जर समोर आणायचे असेल तर स्वतंत्रपणे या प्रकरणाची पोलिस चौकशी होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी मी करणार आहे. शासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्या अहवालातून कोणती माहिती समोर येते, यावरही पुढची कारवाई अवलंबून आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सत्यसमोर आणण्यासाठी संबंधित तारखांचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि जतन करून ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. त्या दिवशी रुग्णालयात नेमके कोण आले होते? याचे उत्तर सीसीटीव्ही आणि कागदपत्रांमधून मिळू शकते. रुग्णालयांचे फायर ऑडिट करणाऱ्या कंपनीकडे आवश्यक तांत्रिक क्षमता आणि अनुभव होता का, याचीही चौकशी व्हावी. रुग्णालयाला साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मिळाला नसल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळला. या पाठीमागची वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.