मुंबई
manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले असतानाच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; मात्र धमकी देऊन मागण्या मान्य करून घेता येत नाहीत, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. “मुंबईत येऊन डिस्टर्ब करतो,” असे वक्तव्य करून जालना आणि संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करत जनजीवन विस्कळीत करणाऱ्यांना सामाजिक जीवनात मान्यता नाही, असा आरोपही त्यांनी केला.
“अंदर से कुछ और आणि बाहेर काही, अशी जरांगेंची भूमिका आहे. त्यांच्या मागण्या संविधानाला धरून नाहीत. ते उघडे पडले असून आता सावरासावर करत आहेत. हौस, मौज आणि व्यक्तिगत गोष्टींसाठी हे करत आहेत. यामुळे मराठा बांधवांचा फायदा होत नाही. युवकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा सदावर्ते यांनी केला.
पोलिसांवरील हल्ल्याच्या प्रकरणांवरूनही सदावर्ते यांनी जरांगेंना लक्ष्य केले. पोलिसांना मारहाण झाली असेल आणि त्यातून रक्तस्राव झाला असेल, तर भारतातील कोणताही कायदा अशा प्रकरणांतील गुन्हे मागे घेण्याची परवानगी देत नाही, असे त्यांनी म्हटले. “आंतरवली सराटीमध्ये ज्या पद्धतीने महिला पोलिसांवर हल्ला झाला, त्यात मुख्य आरोपी का केले नाही? जरांगेंची मागणी पोलीस केसेस मागे घ्या अशी आहे. जरांगेंना सांगतो, म्हातारा होशील, हातात काठी येईपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही. तुझे धनी एकनाथ शिंदेही ही मागणी मान्य करू शकत नाहीत,” अशी टीका सदावर्ते यांनी केली. युवकांना घेऊन चुकीच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जरांगेंच्या ‘५८ लाख नोंदी’ या मागणीवरही सदावर्ते यांनी प्रश्न उपस्थित केले. “दुसरी मागणी ५८ लाख नोंदी... जनाची नाही तर मनाची लाज असावी. माजी न्यायमूर्ती शिंदे साहेब यांनी विखे साहेबांसमोर फोन काढून लावला. तुम्हाला माहिती रेतीच्या ठेकेदारांनी दिली आहे; त्यांना काय कळतं, त्यांना माफ कळतं. आमचे जे संशोधक मराठा भाऊ आहेत, त्यांना विचारा,” असे ते म्हणाले.
“५८ लाख नोंदी १८०० पासून ते १९६७ पर्यंतच्या आहेत. त्या नोंदीत ‘कु’ आला म्हणजे आरक्षण येत नाही. त्यात ४० वेगवेगळ्या जाती आहेत. आजपासून लाडाने मन्या म्हणतो, ये मन्या... हे वास्तव सत्य आहे. कोकणात वेगळे कुणबी आहेत. तू नोंदीचे जप जपतोस. जात प्रमाणपत्र जबरदस्ती करून मिळाले तरी व्हॅलिडिटी होत नाही,” असा दावा सदावर्ते यांनी केला.मराठा समाजाला ओबीसीमध्ये प्रवेश देण्याच्या मागणीवरही त्यांनी आक्षेप घेतला. “मराठ्याला एंट्री कर असे म्हणत आहेस, पण तुला याचे नुकसान माहिती आहे का मन्या? आमच्या शेतीतील माणसाला हे सगळे सांगितले तर ते सांगतील, तू चुकत आहेस,” असे सदावर्ते म्हणाले. उपलब्ध नोंदींमध्ये एकच नोंद अनेक वेळा आलेली असल्याचा दावा करत त्यांनी जन्माची नोंद, मृत्यूची नोंद, शेतजमिनीची नोंद आणि सातबारा अशा विविध नोंदींचा उल्लेख केला. “साडेसात टक्के आता मुस्लिम समाजातील लोक जात आहेत,” असेही त्यांनी म्हटले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही सदावर्ते यांनी प्रश्न उपस्थित केला. “शरद पवार यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की एका वर्गाला तीन वेगवेगळे आरक्षण मिळू शकतात का? एकीकडे EWSचे आरक्षण मागत आहेत, पुढे OBCचे मागत आहेत. मृत झालेल्या कुटुंबीयांतील व्यक्तींना नोकरी द्या,” असे ते म्हणाले.
घुले यांच्या मृत्यूचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी नको का, असा सवाल केला. “जर मराठा समाजातील लोकांना नोकरी देत आहात, तर ज्या ज्या कुटुंबीयांचे मृत्यू झाले आहेत, त्या त्या कुटुंबातील लोकांना जात-पात न पाहता नोकरी द्या. कुटुंब कोणत्याही जातीचे असले तरी ही नोकरी द्यावी लागेल,” अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली.
महसूलमंत्री विखे पाटील यांच्यावरही सदावर्ते यांनी आरोप केले. भारतीय संविधानानुसार अधिकाऱ्यांना बोलता येत नाही, असे सांगत त्यांनी विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी केलेल्या कथित वर्तणुकीवर आक्षेप घेतला. “तुम्ही अशक्य गोष्ट केली आहे. अधिकाऱ्यांना शेतावर राबणाऱ्यांसारखी वागणूक दिली. बैठक बोलावली, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. विखे पाटील ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांसोबत व्यक्त झाले, जातपडताळणीच्या अधिकाऱ्यांना विखे पाटलांनी कोणत्या अधिकारात बोलावले? ते महसूल मंत्री आहेत का? मुख्यमंत्री आहेत का? सामाजिक न्याय मंत्री शिरसाट होते का? कोणत्या अधिकाराने बोलावले?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.भाजप नेते प्रसाद लाड यांनाही सदावर्ते यांनी लक्ष्य केले. “हे काय कंत्राट मिळविले आणि कसेही वाटले असे नाही. मन्या मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलला आहे. तुम्ही लाड, किती दिवस लाड पुरविणार आहात?” असा सवाल त्यांनी केला.दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कलम १६८ अंतर्गत कारवाई केल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला. जालन्याचे अधीक्षक असोत किंवा आझाद मैदान पोलीस, मनोज जरांगे यांना नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “मन्याची मागणी गैर आहे, चुकीची आहे,” असे म्हणत सदावर्ते यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा निशाणा साधला.