५१व्या वर्षी इतिहास! महिला क्रिकेटपटूने मोडला ९४ वर्षांचा विक्रम

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
आइल ऑफ मॅन,
female cricketer breaks 94 year old record आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा कामगिरीच्या आड येत नाही, हे आइल ऑफ मॅनच्या जोन हिक्स यांनी सिद्ध केले आहे. वयाच्या ५१ वर्षे १७३ दिवसांवर त्यांनी एका सामन्यात पाच बळी घेत ९४ वर्षांपासून कायम असलेला विक्रम आपल्या नावावर केला. पुरुष आणि महिला अशा दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा मान हिक्स यांना मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे बर्ट आयर्नमॉन्गर यांच्या नावावर होता.
 
female cricketer breaks 94 year old record
 
जोन हिक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही तुलनेने उशिरा केले होते. वयाच्या ४७व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. आता ५१व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रीसच्या महिला संघाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात उजव्या हाताच्या ऑफ-स्पिन गोलंदाज असलेल्या हिक्स यांनी केवळ १० धावा देत पाच विकेट्स मिळवल्या. ही त्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
 
विशेष म्हणजे हिक्स यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. याआधीही त्यांनी ग्रीस आणि माल्टाविरुद्ध अशाच प्रकारची कामगिरी केली होती. बर्ट आयर्नमॉन्गर यांनी १९३१ आणि १९३२ मध्ये अनुक्रमे ४९ वर्षे २३४ दिवस आणि ४९ वर्षे ३१४ दिवसांच्या वयात पाच बळी घेतले होते. त्यांचा तब्बल ९४ वर्षांचा विक्रम हिक्स यांनी मागे टाकला.
 
हिक्स यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर आइल ऑफ मॅनच्या महिला संघाने ग्रीसला मोठ्या फरकाने पराभूत केले. ग्रीसचा संपूर्ण संघ १५ षटकांत केवळ ५२ धावांवर बाद झाला. त्यानंतर आइल ऑफ मॅनने हे लक्ष्य पॉवरप्लेमध्येच पूर्ण करत नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. या कामगिरीसह हिक्स या ५० वर्षांपेक्षा जास्त वय असताना पुरुष आणि महिला दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांत पाच बळी घेणाऱ्या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.