मनाच्या अंगणातला श्रावण...
shravan joy ही ओळ कानावर पडली की, मनाच्या कुठल्या तरी गाभाऱ्यात नकळत एक हिरवा दरवाजा उघडतो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू असते, ओल्या मातीतून सुटणारा मंद सुगंध श्वासात भरतो आणि क्षणभर का होईना, माणूस आपल्या धावपळीच्या जगातून निसर्गाच्या कुशीत जाऊन विसावतो. श्रावण म्हणजे केवळ पंचांगातील एक महिना नाही; तो मनाचा ऋतू आहे, नात्यांचा उत्सव आहे आणि भारतीय संस्कृतीच्या ओलाव्याने चिंब झालेला एक सुंदर अनुभव आहे. आषाढाच्या मुसळधार पावसानंतर श्रावणाची चाहूल लागते आणि सृष्टीचे रूपच पालटून जाते. वृक्षांच्या प्रत्येक फांदीवर नवजीवनाची पालवी डुलत असते. नदी-नाले भरून वाहत असतात. श्रावणातील आकाशही विलक्षण लहरी असते. ऊन-पावसाचा लपंडाव इतका मोहक असतो की, बालकवींच्या शब्दांची आठवण अपरिहार्यपणे होते,
‘क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे...’
तो कधी रुसलेला, कधी हसरा; कधी चिंब भिजवणारा तर कधी इंद्रधनुष्याची रंगीत भेट देणारा. त्याच्या प्रत्येक सरीत एक वेगळी कविता दडलेली असते. पहाटेच्या वेळी ओल्या पानांवर अलगद विसावलेले दवबिंदू सूर्यकिरणांची चाहूल लागताच हिऱ्यांसारखे चमकू लागतात. जाई, जुई, मोगरा, पारिजातक, सोनचाफा यांच्या सुगंधाने अंगण भरून जाते. कुठेतरी कोकिळेचा मंजुळ स्वर ऐकू येतो, तर चिमण्या आणि इतर पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात चैतन्याची वीण विणत राहतो. श्रावण हा निसर्गाचा रंगोत्सव आहे; त्याच वेळी मानवी भावविश्वाचाही उत्सव आहे. घराच्या उंबरठ्यावर रांगोळी उमटते, देवघरात फुलांचा सुगंध दरवळतो, स्वयंपाकघरातून सणासुदीच्या पदार्थांचा दरवळ बाहेर येतो आणि घरातील प्रत्येक चेहऱ्यावर प्रसन्नतेची एक वेगळीच झळाळी दिसते.
भारतीय संस्कृतीने सणांची निर्मिती केवळ धार्मिक विधी म्हणून केली नाही. माणूस माणसाशी जोडला जावा, कुटुंबात संवाद टिकावा, श्रमांना विसावा मिळावा आणि जीवनात मांगल्याचा श्वास राहावा, या व्यापक भावनेतून सण-उत्सवांची परंपरा निर्माण झाली. म्हणूनच श्रावणातील प्रत्येक दिवस एखाद्या नात्याला, एखाद्या मूल्याला किंवा एखाद्या जीवनदृष्टीला स्पर्श करून जातो. घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करणारा माणूस अनेकदा स्वतःलाच हरवून बसतो. व्यवहारांच्या गर्दीत मनाला निवांत क्षण मिळत नाहीत. अशा वेळी श्रावण जणू हात धरून म्हणतो, ‘थोडं थांब, आभाळाकडे बघ, पावसाचा आवाज ऐक आणि मातीचा गंध मनभर साठवून घे.’
श्रावणातील सोमवार भक्तीचा, मंगळवार मंगळागौरीचा, पंचमी नागपूजेचा, पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा, अमावास्या पोळ्याची कृतज्ञता व्यक्त करणारी अशी विविध सणांची मालिका या महिन्याला सांस्कृतिक समृद्धी बहाल करते. या प्रत्येक उत्सवामागे मानवी जीवनाला अधिक सुंदर करणारा एखादा अर्थ दडलेला आहे.
श्रावणाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे निसर्ग आणि साहित्य यांचे अतूट नाते. कित्येक कवींनी आपल्या प्रतिभेला या महिन्यातील हिरवळ, रिमझिम, मोरपिसारा आणि धुंद वातावरणातूनच शब्दांचे पंख दिले. मंगेश पाडगावकर लिहितात—
‘श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा,
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा.’
पावसाच्या प्रत्येक थेंबाला जणू रेशमाचा स्पर्श लाभतो. कवितेची निर्मिती बाहेरच्या निसर्गातून होत असली तरी तिचे खरे घर मानवी मनात असते. म्हणूनच श्रावण प्रत्येकाला वेगळा दिसतो. शेतकऱ्याला तो भरघोस पिकांची आशा वाटतो; कवीला प्रेरणेचा झरा वाटतो; बालकाला चिखलात उड्या मारण्याचा आनंद वाटतो; तर वृद्धाला जुन्या आठवणींचा ओलसर दरवळ घेऊन येतो. खरं तर माणसाच्या आयुष्यातील अनेक सुंदर स्मृती श्रावणाशी जोडलेल्या असतात.shravan joy शाळेत जाण्यापूर्वी आईने दिलेली गरम भजी, ओल्या रस्त्यावर कागदी होडी सोडण्याची बालहौस, आजीने सांगितलेल्या पुराणकथा, देवघरातील अखंड तेवणारी समई, संध्याकाळी अंगणात दरवळणारा पारिजातक या आठवणींचा सुगंध वर्षानुवर्षे तसाच टिकून राहतो.
आजच्या बदलत्या काळात परंपरा जपण्याचा अर्थ जुन्यात अडकून राहणे असा नाही. नव्या पिढीने सणांचा बाह्य देखावा नव्हे, तर त्यामागील मानवी मूल्ये आत्मसात केली तर संस्कृती अधिक समृद्ध होईल. स्वच्छता, पर्यावरणप्रेम, नातेसंबंधांची जपणूक, कृतज्ञता, सहकार्य आणि आनंदाची देवाणघेवाण, हीच श्रावणाची खरी शिकवण आहे.
श्रीपाद टेंबे
पुणे - ९१५८०८८०४२