‘कापूसकोंडा’ची पहिली झलक रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
मुंबई
kapuskonda माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना तसेच नातेसंबंधांचे विविध पदर मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या ‘कापूसकोंडा’ या आगामी मराठी चित्रपटाची पहिली झलक रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार असून, प्रदर्शित झालेल्या पहिल्या झलकीने चित्रपटाविषयीची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.
 

kapuskonda first look released on raksha bandhan, film to hit theatres on october 23 
पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत, व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि स्टोरीवाला फिल्म यांच्या सहकार्याने हा चित्रपट सादर करण्यात आला आहे. जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी ‘कापूसकोंडा’ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले असून, सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटातील गाण्यांना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे, तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील यांचे आहे. गायक अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजाने चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
‘कापूसकोंडा’मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी लक्षवेधी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. कथानकाची गरज लक्षात घेऊन चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आले आहे.
सचिन पिळगांवकर kapuskonda यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात मधुराणी गोखले यांनी कँडी ही मजेशीर भूमिका साकारली होती. आता ‘कापूसकोंडा’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.‘कापूसकोंडा’ची कथा अत्यंत अनोखी असून मानवी नातेसंबंध, कुटुंब आणि भावभावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करते. चित्रपटाच्या पहिल्या झलकीची सुरुवात ‘कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?’ या प्रश्नाने होणाऱ्या व्हॉइसओव्हरने होते. त्यानंतर मधुराणी गोखले आणि दोन मुली आश्चर्याने पाहताना दिसतात. पुढच्या प्रसंगात भांडीकुंडी इतस्ततः पसरलेल्या खोलीत सचिन पिळगांवकर मांडीवर कुत्रा असल्याने भेदरलेल्या अवस्थेत दिसतात.पहिल्या झलकीतील हे दोन प्रसंगच चित्रपटाच्या कथानकाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण करतात. माणूस आणि प्राणी यांच्यातील भावबंधांसोबतच मानवी नात्यांचे हळवे पैलू उलगडणारी ही कथा, त्याला लाभलेल्या सक्षम अभिनयाच्या साथीने प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘कापूसकोंडा’कडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.