नेपाळच्या पुरावरून खडगेंच मोदींना पत्र

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Kharge's letter to Modi नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. पूरग्रस्तांना आवश्यक ती मानवतावादी मदत देण्यासोबतच नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. नेपाळमधील पूरस्थितीनंतर बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे. या आपत्तीत ५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे १,००० जण अद्याप बेपत्ता असल्याचे माध्यमांच्या वृत्तांतून समोर आले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांना अन्न, औषधे, निवारा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्याचे खडगे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
 
 
 
Kharge
 
खडगे यांनी पंतप्रधान मोदींना नेपाळ सरकारसोबत समन्वय साधून पूरग्रस्तांना पुरेशी मदत आणि मानवतावादी सहाय्य मिळेल, याची खात्री करण्याची विनंती केली आहे. भारताकडून नेपाळला इतर देशांच्या तुलनेत अधिक मदत दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मदतकार्य आणखी प्रभावी करण्याची मागणी केली आहे.नेपाळच्या विविध भागांमध्ये भारतीय नागरिक तसेच भारतीय वंशाचे काही लोक अडकले असल्याबद्दलही खडगे यांनी चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, अंदाजे ३२० भारतीय नागरिक संपर्काबाहेर असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना बचाव आणि स्थलांतराचे प्रयत्न वेगाने करण्याचे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
अडकलेल्या नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून त्यांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात याव्यात, असेही खडगे यांनी म्हटले आहे. या कठीण परिस्थितीत भारत सरकारने तातडीने सर्वतोपरी मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केलेल्या या मागण्यांमुळे नेपाळमधील आपत्ती आणि तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.