जरा थांबा, दम धरा, बघा कशी लाट उसळते

मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
मुंबई
manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार पुन्हा उपसले असून आजपासून अंतरवली सराटीत आंदोलनाला सुरुवात केली आहे. हे आपले शेवटचे आंदोलन असल्याचे सांगतानाच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईवर धडक देण्याचा इशारा त्यांनी आधीच दिला होता. आता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “मुंबईत आंदोलन करणारच आहे, वर्षावरच आंदोलनाला बसणार आहोत. मुंबई बंद पडो, मागे जावो, नाहीतर काही होवो; आम्ही येणारच,” असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिला.
 

manoj jarange patil launches fresh protest, warns of massive march to mumbai over maratha reservation 
“मुंबईत आम्ही आंदोलन करणारच आहोत. वर्षावरच जाऊन आंदोलनाला बसणार आहोत. जरा थांबा, दम धरा, बघा कशी लाट उसळते. मराठा आंदोलकांचा महाप्रलय येणार आहे. मुंबईत मराठे जाणारच आहेत. आता माघारी जाणार नाही,” असे जरांगे म्हणाले.
मात्र, मुंबईतील नागरिकांना त्रास होऊ नये, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “आम्हाला मुंबईला नाराज करायचं नाही. मुंबई आमचीच आहे. मुंबईतील लोक, तिथला मराठी माणूस, ओबीसी माणूस आमचा आहे. मुंबईतील कोणत्याही नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की मराठी आडमुठे नाहीत, सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत आहे. हे मुंबईकरांना समजलं पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. “इथे वेळ देणार आम्ही. पण ते नाही केलं तर मुंबईतील आणि महाराष्ट्रातील सगळी जनता सरकारला बोलेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला. “आमच्या पोरांपैकी एकालाही हात काय, नुसतं बोट लावून तर दाखवा; मग सांगतो तुम्हाला. राज्यातले, पक्षातले नेते घराच्या बाहेरसुद्धा मराठे तुम्हाला निघू देणार नाहीत. नेत्यांना सुट्टी देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सरकारने मराठा आरक्षण दिल्यास मुंबईत येण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आरक्षण न दिल्यास “६ कोटी मराठी जनता ४५ लाख गाड्या घेऊन मुंबईत येईल. त्यानंतर मुंबई बंद पडो, मागे जावो किंवा काहीही होवो, आम्ही मागे हटणार नाही,” असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
आपल्या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “समाज आणि समाजातील लेकरांना मोठं करायचं, हेच आमचं स्वप्न आहे. तुम्ही लोकांना किती दिवस येड्यात काढणार? गेली तीन वर्षे आंदोलन केलं; आता हे शेवटचं आंदोलन आहे. सगळ्या पक्षांना आणि नेत्यांना मराठा समाज आपली ताकद दाखवून देणार आहे.”
यावेळी जरांगे यांनी राष्ट्रवादी manoj jarange patil  काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही सडकून टीका केली. तहसीलदार आणि संबंधित अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र देत असताना जातपडताळणी समितीची भूमिका काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “भुजबळांना खडा टाकायची आणि शितोडे उडवायची सवय झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.
“इतर राज्यांमध्ये अशी व्यवस्था नाही. तहसीलदार सक्षम नाहीत का?” असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी जातपडताळणी समित्यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा आता पुन्हा मुंबईकडे वळण्याचे संकेत मिळत असून, सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.