नवी दिल्ली,
uzbek students उझबेकिस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताश्कंदमधील विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यावर आनंद व्यक्त केला. या व्हिडिओमध्ये उझबेकिस्तानमधील विद्यार्थी हिंदी भाषेत पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी भारत, भारतीय संस्कृती आणि दोन्ही देशांमधील मैत्रीबद्दलही आपले विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत केलेले स्वागत पाहून मोदींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली. मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, उझबेकिस्तानला भेट देण्यापूर्वी तेथील तरुण मित्रांचा उत्साह पाहून आपल्याला आनंद झाला. विद्यार्थ्यांनी हा उत्साह अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केला असून, त्यांनी हिंदीमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या भावना मांडणे ही त्याहून विशेष बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

या व्हिडिओमध्ये ताश्कंदमधील अनेक विद्यार्थी एकामागून एक पंतप्रधानांचे स्वागत करताना दिसतात. एका विद्यार्थ्याने स्वतःची ओळख समंदर अशी करून देत ताश्कंदमध्ये पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदी यांच्या भेटीची आपण आतुरतेने वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले. अन्य विद्यार्थ्यांनीही ताश्कंदची भूमी त्यांची वाट पाहत असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी हिंदी शिकत असल्याचे सांगताना भारतीय संस्कृतीबद्दल आपली आवड व्यक्त केली. भारत आणि उझबेकिस्तानमधील मैत्री दोन्ही देशांतील तरुणांसाठी विशेष असल्याचेही एका विद्यार्थ्याने म्हटले. पंतप्रधानांच्या ताश्कंद भेटीची आपण उत्सुकतेने वाट पाहत असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
दरम्यान, नरेंद्र मोदी शनिवारी उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून दोन दिवस ताश्कंदमध्ये असतील. या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, डिजिटल कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा होणार आहे. विकसित भारत आणि उझबेकिस्तानच्या प्रगतीशी संबंधित सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्यावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
ताश्कंद दौऱ्यात मोदी ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमधील शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. ही दोन्ही ठिकाणे भारत आणि उझबेकिस्तानमधील सांस्कृतिक तसेच जनतेतील संबंधांचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. उझबेकिस्तानचा हा त्यांचा चौथा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी २०१५ मध्ये द्विपक्षीय भेट दिली होती, तर २०१६ आणि २०२२ मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी ते उझबेकिस्तानला गेले होते.
ताश्कंदमधील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मोदी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे रवाना होतील. राष्ट्राध्यक्ष सादिर जपारोव यांच्या निमंत्रणावरून ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित २६व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामुळे मध्य आशियातील देशांसोबत भारताचे राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.