नवी दिल्ली,
Modi's roadmap for India in SCO शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) आगामी शिखर परिषदेत भारत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका मांडणार आहे. या संपूर्ण प्रदेशातून दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षा, संपर्क व्यवस्था आणि नव्या संधींवर आधारित भारताची भूमिका SCOच्या व्यासपीठावर मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या भेटीदरम्यान मध्य आशियातील देशांसोबत भारताचे सामरिक संबंध आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक, डिजिटल कनेक्टिव्हिटी, संरक्षण आणि ऊर्जा अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याबाबतही चर्चा होणार आहे.
दौऱ्याच्या सुरुवातीला मोदी २९ आणि ३० ऑगस्ट रोजी उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे असतील. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव यांच्या निमंत्रणावरून होणाऱ्या या भेटीत दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीला नवी दिशा देण्यावर चर्चा होईल. व्यापार आणि गुंतवणुकीबरोबरच डिजिटल क्षेत्र, संरक्षण आणि ऊर्जा सहकार्य अधिक व्यापक करण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असेल.ताश्कंद दौऱ्यात मोदी ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमधील शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. भारत आणि उझबेकिस्तानमधील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध तसेच दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध अधोरेखित करणारी ही ठिकाणे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
ताश्कंदनंतर पंतप्रधान मोदी किर्गिझ प्रजासत्ताकची राजधानी बिश्केक येथे पोहोचतील. राष्ट्राध्यक्ष सादिर जपारोव यांच्या निमंत्रणावरून ते २६व्या SCO शिखर परिषदेत सहभागी होतील. SCOच्या २५व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारत २०१७ पासून या संघटनेचा सक्रिय आणि रचनात्मक सदस्य राहिला आहे. या परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदी यांनी सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन प्रमुख आधारांवर या प्रदेशासाठी भारताची दूरदृष्टी पुढे नेण्याचे संकेत दिले आहेत. दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीपणापासून मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी SCOमधील इतर सदस्य देशांसोबत भारत सहकार्य करणार आहे. या समस्या भारताच्या शेजारील प्रदेशासह त्यापलीकडील भागातील शांतता आणि स्थैर्यासाठी सातत्याने धोका निर्माण करत असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.