अमरावती
mp-bonde राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना सोशल मीडिया वरून मारण्याची धमकी देणाऱ्या व त्यांच्या वडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा, या मागणीसाठी भाजपाचे शहराध्यक्ष डाॅ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेनंतर २६ ऑगस्टला शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी स्त्री रुग्णालय भेट दिली. त्यावेळी त्यांनी व पराग गुडधे यांनी रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेथे कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. झालेली ही कारवाई खा. अनिल बोंडे यांच्या सांगण्यावरुनच झाली, असा समज पराग गुडधे यांचा झाला. त्याने सोशल मिडियावर अमरावतीच्या जनतेमध्ये तेढ निर्माण करण्याच्या, कायदा व सुव्यवस्था बिघडेल या उद्देशाने एक उत्तेजित भाषण टाकले. त्यामध्ये खा. अनिल बोंडे यांना जीवे मारण्याची व शारिरीक दुखापत करण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले आहे.
या प्रकरणात तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करावा व धमकी देणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मंगेश खोंडे, संजय तिरथकर, विक्की शर्मा, राजेंद्र मेटे, प्रवीण वैश्य, आशिष अतकरे, चेतन पवार, आकाश पाटील, शैलेंद्र मिश्रा, भारती गुहे, अंजली पाठक, सत्यजीत राठाेड, दिपक खताडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होेते.