MPSC पेपरफुटीचा तपास नंदुरबारपर्यंत!

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
नंदुरबार,
MPSC paper leak investigation extends to Nandurbar महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणात कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नंदुरबारमध्ये तब्बल १४ तास कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत नेमकी कोणती माहिती मिळाली, याबाबत पोलिसांकडून मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे.शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पथक प्रवीण पाटील यांना तपासासाठी नंदुरबारमध्ये घेऊन आले. कौटिल्य अकॅडमीमध्येही त्यांची चौकशी करण्यात आली. सुमारे तासभर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अकॅडमीच्या बाहेर आणले. दरम्यान, अकॅडमीमधून काही महत्त्वाचे दस्तऐवज तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 

MPSC paper leak investigation extends to Nandurbar 
 
तपासादरम्यान प्रवीण पाटील यांच्याकडून ई-साक्ष घेण्याची प्रक्रिया तसेच ओळख परेडही करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरासह मूळ गावी नेऊन झडती आणि तपासणी करण्यात आल्याचीही चर्चा आहे. या चौकशीनंतर प्रकरणाला नवे धागेदोरे मिळाल्याची चर्चा असून, तपासाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढू शकते. मुंबई गुन्हे शाखेचे पथक पुन्हा नंदुरबारमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, काही संशयितांना चौकशीसाठी सोबत आणले जाऊ शकते. नंदुरबारमधील आणखी कोणाची चौकशी होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
 
 
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेभोवती यापूर्वीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर पेपरफुटीची तक्रार बनावट ई-मेलवर आधारित असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली होती. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी परीक्षेतील काही उमेदवारांच्या निकालावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत सोशल मीडियावरून प्रशासनाला सवाल केला आहे.
 
 
 
MPSCच्या परीक्षेत एका उमेदवाराकडून प्रश्नपत्रिका किंवा गैरप्रकाराशी संबंधित बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होऊन कारवाई करण्यात आली, तर पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीत तीन उमेदवारांकडून हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतरही उर्वरित भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय कशाच्या आधारावर घेण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.एकाच्या गैरप्रकारामुळे परीक्षा रद्द होऊ शकते, तर तीन उमेदवारांकडून गैरप्रकार समोर आल्यानंतर परीक्षा रद्द का होऊ नये, असा सवाल मेहबूब शेख यांनी केला आहे. गैरप्रकाराचा प्रत्यक्ष विस्तार किती होता, त्याचा आणखी कोणत्या उमेदवारांना फायदा झाला का, परीक्षा यंत्रणेची जबाबदारी काय होती आणि निकाल पूर्णपणे निष्पक्ष आहे का, या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. MPSC असो किंवा पुणे महापालिका, परीक्षेचे नियम सर्वांसाठी समान असावेत आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.