मिरवणुकीत प्लाझ्मा, प्रेशर बीम नकोच : मुरलीधर मोहोळ

केंद्रीय मंत्र्यांची तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
पुणे,
murlidhar mohol गणशोत्सव मिरवणुकीत डीजेद्वारे होणारे ध्वनी प्रदुषणावर मंडळांनी नियंत्रण ठेवले पाहिजेच; त्याशिवाय प्लाझ्मा, प्रेशर बीम सारख्या आत्यंतिक ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गोष्टी नकोच, अशी भूमिका केंद्रीय विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली.
 

murlidhar mohol urges ganesh mandals to avoid plasma and pressure beam during visarjan processions 
जंगली महाराज रस्ता येथील तरुण भारत पुणे कार्यालयाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य संपादक शैलेश पांडे, निवासी संपादक सचिन कापसे आणि तरुण भारतच्या टीमशी संवाद साधला.
 
मोहोळ म्हणाले की,murlidhar mohol  गणेशोत्सवात मंडळांचा उत्साह दांडगा असतो, तो असायला हवा. मात्र मिरवणुकीचा मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता मंडळांनी घ्यायला हवी. त्यासाठी डीजेच्या आवाजावर नियंत्रण हवेच; त्याच बरोबर प्लाझ्मा, प्रेशर बीम यासारखे फार अधिक ध्वनीप्रदूषण करणारे साउंड नकोच. लेझर लाईटच्या किरणांमुळे अनेकांना दृष्टीदोष होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेही शक्यतो टाळावे. गणेशोत्सव हा सर्वांसाठी आनंदाचा सोहळा व्हावा, त्याचा कोणाला त्रास होऊ नये, ही भूमिका मंडळांनी आजपर्यंत घेतली आहे. मंडळांनी अनेक सामाजिक उपक्रमांतून समाजाला मदत केली आहे. त्यामुळे यावर्षीही मंडळांकडून अशीच भूमिका घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांवर अधिक भर दिला पाहिजे, असे माझे त्यांना आवाहन आहे. त्यासाठी मी गणेश मंडळ, ढोला-ताशा पथक आणि पोलिसांशी संवाद साधला आहे. त्या साऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सवही दरवर्षीप्रमाणे निर्विघ्न पार पडणार यात शंका नाही.
 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद पुण्याला मिळावे
 
 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२९ चे यजमानपद पुण्याला अर्थात महाराष्ट्राला मिळावे यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे अधिकृत प्रस्ताव पाठविला आहे. यजमानपदासाठी देशभरातून अनेक राज्यांनी प्रस्ताव दिला आहे. मात्र तो महाराष्ट्राला मिळावा यासाठी मी स्वतः केंद्राकडे आग्रही आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यातील स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळेल. त्या स्पर्धांची तयारी करता येईल. मी स्वतः क्रीडापटू असल्याने येथील खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.