बुलढाणा
national-sports-day खेळाडूंनी देशासाठी खेळले पाहिजे. खेळभावना जोपासतांना राष्ट्र प्रथम हि भावना निर्माण झाली पाहिजे. मेजर ध्यानचंद यांनी १९३६ च्या बर्लिन ऑल्मपीक मध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिल्या नंतर अॅडाल्फ हिटलर यांनी त्यांना नागरिकत्व व संपूर्ण सुविधा देण्याचे आवाहन केले. पंरतू ते त्यांनी नाकारले. देशासाठी मी कोणतीही लाचारी पत्करणार नाही हीच देशभक्तीची भावना खेळाडूंनी आत्मसात करावी. असे आवाहन आंतरराष्ट्रीय धुर्नविद्या प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांनी केले.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी जिजामाता क्रीडा संकूल मैदानावर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंचावर आंतरराष्ट्रीय धर्नुविद्या प्रशिक्षक चंद्रकांत इलग सहकार विद्या मंदीरचे क्रिडा शिक्षक सय्यद आबीद, प्रबोधन विद्यालयाचे उपमुख्यध्यापक रविंद्र गणेशे, राज्य क्रिडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातील मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रिडा कार्यालयाच्या वतीने मान्यवरांचा कुबेर वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खेळाडूंना रविंद्र गणेशे व सय्यद आबीद यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व खेळाडूंना खेळाडू वृत्ती जोपासावी यासाठी प्रतिज्ञा देण्यात आली. या दरम्यान खेळाडूंच्या २९ आव्हानात्मक कृती देण्यात आली. उत्कृष्ठ कृती करणार्या खेळाडूंना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला लांडगे यांनी केले. तर संचलन व आभार राज्य क्रिडा मार्गदर्शक जिवन मोहोड यांनी केले. याप्रसंगी क्रिडा कार्यालयाचे विनोद गायकवाड, सुहास राऊत, क्रिडा शिक्षक मोहम्म्द शकील, गोवर यासह क्रिडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाला जिल्हा क्रिडाधिकार्यांची दांडी
२९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रिडा दिन संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात या कार्यक्रम जिजामाता क्रिडा संकूल येथे आयोजित करण्यात आला होता. अतिशय महत्वाचा कार्यक्रम असतांना जिल्हा क्रिडा अधिकारी भक्ती आंब्रे या उपस्थित नव्हत्या. यासंबधी आमचे प्रतिनिधी यांनी भ्रमणध्वनी केले असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. वास्तविक राष्ट्रीय क्रिडा दिनाला जिल्हा क्रिडा अधिकार्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. येथेही त्यांची अनास्था दिसून येते.