गणेशोत्सवात ढोल - ताशांचा अतिरेक नकोच : मेधा कुलकर्णी

खासदारांची तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
पुणे,
Medha Kulkarni गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे उत्साही वातावरण झाले पाहिजे, हे खऱेच. मात्र, त्याच्या अतिरेकामुळे नागरिकांना त्रास व्हायला नको आणि त्यामुळे ढोल-ताशांचा अतिरेक नकोच, अशी भूमिका खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली आहे.
 
 
No Excessive Dhol-Tasha During Ganeshotsav, Says MP Medha Kulkarni
खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार, २९ ऑगस्ट रोजी जंगली महाराज रोडवरील तरुण भारत पुणे कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्य संपादक शैलेश पांडे, निवासी संपादक सचिन कापसे यांच्यासह उपस्थित असलेल्या तरुण भारतच्या सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
 
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, हल्ली गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशांचा अतिरेक होतो. मिरवणुकीतून ढोल-ताशा पथक थेट सोसायट्यांमध्ये आला आहे. त्याच्या दणदणाटाचा छोट्या मुलांबरोबर, ज्येष्ठांना, आजारी असलेल्या व्यक्तींना प्रचंड त्रास होतो. त्यांचाही विचार केलाच पाहिजे. ढोल-ताशा पथकांना अनेकदा नियमांचा विसर पडतो, अगदी १४-१५ वर्षांची मुलेसुध्दा या पथकात वादक म्हणून सहभागी होत आहेत. त्या मिरवणुकीत सतत होणाऱ्या आवाजामुळे त्यांच्या कानांवर मोठा परिणाम होतो आहे. या दुष्परिणामांचा विचार करता ढोल ताशा पथकांनी सामाजिक भान राखले पाहिजे. पुण्यात होणारे ध्नवी प्रदूषण कमी करण्यासाठी पथकांनी दणदणाटावर नियंत्रण आणण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. पोलिसांनीही आधुनिक तंत्राद्वारे आवाजाच्या तीव्रतेची मर्यादा पाळण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

रात्रीच्या रॅलीत फेटा बांधून फिरणे हा पुरुषार्थ नव्हे
 
सध्याच्या काळात रात्रीच्यावेळी  Medha Kulkarni  आणि त्यातही मध्यरात्री महिलांची मोटारसायकल रॅली काढण्याचे मोठे फॅड आले आहे. अनेक महिलाही त्यामध्ये फेटा बांधून सहभागी होतात. शे-पाचशे महिलांनी एकत्रित रॅली काढून हॉर्न वाजवीत रॅली काढणे म्हणजे महिला सुरक्षित झाल्या असे होत नाही. रात्रीच्या वेळी एकटी महिला रस्त्यावर निर्धास्तपणे फिरु शकली तरच ते शहर महिलांसाठी सुरक्षित आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे रॅलीत फेटा बांधून फिरणे म्हणजे पुरुषार्थ नाही हे महिलांनी आणि अशा रॅली काढणाऱ्या आयोजकांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या.