लॉर्ड्सवर पाक फलंदाजांचा फ्लॉप शो!

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
लॉर्ड्स,
pakistani batsmens flop show at lords इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानच्या फलंदाजांची खराब कामगिरी कायम असून, लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा पहिला डाव अवघ्या ११० धावांवर आटोपला. मालिकेत आतापर्यंत पाकिस्तानने तीन डाव खेळले आहेत, मात्र एकदाही त्यांना २०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. या सातत्याने होत असलेल्या निराशाजनक कामगिरीवर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांनी नाराजी व्यक्त केली.
 
pakistani batsmens flop show at lords
 
सामना संपल्यानंतर सरफराज यांनी पाकिस्तानी फलंदाजांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केला. संघ वारंवार केवळ ३० ते ३५ षटकांतच सर्वबाद होत असल्याने या समस्येकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. फलंदाजांशी याबाबत चर्चा झाली असून, क्रीजवर पुरेसा वेळ टिकून राहण्यात आपली अडचण असल्याची जाणीव त्यांनाही असल्याचे सरफराज यांनी स्पष्ट केले.
 
इंग्लंडमधील परिस्थिती फलंदाजांसाठी कठीण असली तरी सुरुवातीचा काळ संयमाने खेळणे आवश्यक असल्याचे सरफराज यांनी सांगितले. पहिल्या ३० ते ४० चेंडूंमध्ये फलंदाजांची खरी परीक्षा होत असते. हा टप्पा योग्य तंत्र आणि संयमाने पार केल्यास त्यानंतर संघाला चांगली धावसंख्या उभारण्याची संधी मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
 
या डावात १०२ चेंडूंचा सामना करत ४६ धावा करणाऱ्या सलामीवीर अझान ओवैसच्या खेळीचे सरफराज यांनी विशेष कौतुक केले. सुरुवातीचा दबाव त्याने चांगल्या पद्धतीने हाताळला आणि त्यानंतर काही चांगले फटकेही लगावले, असे त्यांनी सांगितले. सामन्याचा पहिला तास किंवा सुरुवातीचे ४० ते ५० चेंडू योग्य तंत्राने खेळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, फलंदाजीतील कमजोरी दूर करण्यासाठी संघरचनेत बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सरफराज यांनी सांगितले. मात्र, त्याचा परिणाम मैदानावर दिसून आला नसल्याची कबुली त्यांनी दिली. मागील कसोटीच्या तुलनेत लॉर्ड्सवरही पाकिस्तानची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी फलंदाजी ही संघासाठी मोठी चिंता बनली आहे. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांनी आपल्या वृत्तीत सुधारणा करून अधिक काळ क्रीजवर टिकण्याची गरज असल्याचे सरफराज यांनी स्पष्ट केले.