रक्षाबंधन धर्मपालनांचा उत्सव : पं. अग्निहोत्री

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
वर्धा,

raksha bandhan राखी बांधण्याची परंपरा दैविक किंवा पौराणिक काळापासून सुरू झाल्याचे अनेक मान्यतांमध्ये सांगितले जाते. या परंपरेची सुरुवात सत्ययुगापासून झाली असे मानले जाते आणि अनेक पौराणिक कथांमधून तिचा उगम स्पष्ट होतो. राखीचा सण धर्मपालनांचा उत्सव असल्याचे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
 

raksha bandhan is a festival of dharma and devotion: pandit agnihotri 
शुक्रवार २८ रोजी महाकाली धामतीर्थ येथे राखी पौर्णिमा व पंधरवाडी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी त्रिदेवींचे अष्टांग योग पूजन व होम हवन करण्यात आले.
पं. अग्निहोत्री पुढे म्हणाले, सर्वात प्राचीन कथेनुसार, देवता आणि असुर यांच्यातील भयंकर युद्धात देवता कमजोर पडू लागले. तेव्हा देवराज इंद्राची पत्नी शचीदेवी (इंद्राणी) हिने भगवान विष्णूंची उपासना करून मंत्रोच्चाराच्या जोरावर एक पवित्र रक्षासूत्र तयार केले आणि इंद्राच्या मनगटावर बांधले. यामुळे इंद्राला नवीन शक्ती मिळाली आणि त्याने असुरांवर विजय मिळवला. याच घटनेपासून रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. दुसर्या प्रसिद्ध कथेनुसार, जेव्हा राजा बलीने आपल्या तपश्चर्याने देवतांनाही संकटात टाकले, तेव्हा विष्णूने वामन अवतार घेऊन त्याच्याकडे तीन पावले जमीन मागितली. त्यानंतर विष्णूंना स्वर्गात परत आणण्यासाठी लक्ष्मीने साध्या स्त्रीचा वेष घेत राजा बलीकडे जाऊन त्याला राखी बांधली आणि त्याला भाऊ मानले. बदल्यात तिला विष्णूंना सोबत नेण्याची परवानगी मिळाली. ही घटना श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घडली आणि तेव्हापासून बहिणीने भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. महाभारतातील आणखी एक प्रसिद्ध कथा सांगते की, जेव्हा श्रीकृष्ण सुदर्शन चक्र चालवताना जखमी झाले तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या जखमेवर बांधला. या घटनेने द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांच्यातील भावंडासारखे नाते दृढ झाले आणि तेव्हापासून राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली असेही मानले जाते. मृत्यूची देवता यमराज आणि यमुना नदी हे दोन्ही भाऊ-बहीण आहेत. पौराणिक कथेनुसार, यमुनेने श्रावण पौर्णिमेला यमराजाच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी त्याच्या हातावर पवित्र धागा बांधला होता. यामुळे प्रसन्न होऊन यमराजाने यमुनेला जे भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतील त्यांचे अकाली मृत्यूपासून रक्षण होईल, असे वचन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.