नागपूर,
Roads dug up for cables in Ganguly Layout पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही जयप्रकाशनगर परिसरातील गांगुली लेआऊटमध्ये केबल वायर टाकण्यासाठी रस्ते फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसामुळे आधीच रस्त्यांची अवस्था बिकट असताना सुरू असलेल्या या खोदकामामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. थोदलेल्या रस्त्यामुळे वाहनांची ये-जा करणे, तसेच घराबाहेर वाहने काढणेही नागरिकांना कठीण झाले आहे. गांगुली लेआऊट परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पावसाळ्यात खोदलेला रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याचे कामही अवघड होते. त्यातच शनिवारी सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने या खोदकामामुळे तयार झालेल्या चिखलामुळे परिसराची अवस्था फारच खराब झाली आहे. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने आता या भागात पाणी साचण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
नियम असताना कामाला परवानगी कशी?
पावसाळ्यात रस्ते खोदण्यावर निर्बंध असताना संबंधित विभाग अथवा यंत्रणेने या कामाला परवानगी कशी दिली, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अत्यावश्यक काम असल्यासही खोदकामासाठी योग्य नियोजन, सुरक्षितता उपाययोजना आणि काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने रस्ता पूर्ववत करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कडेला किंवा घरांसमोर खोदकाम झाल्यामुळे काही नागरिकांना आपली वाहने बाहेर काढण्यासाठीही अडचणीयेत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच पावसात पायी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सणांच्या दिवसांत वाढणार गैरसोय
येत्या काही दिवसांत कृष्णजन्माष्टमीचा सण आहे. त्यानंतर गणेशोत्सवाचीही लगबग सुरू होणार आहे. सणांच्या काळात नागरिकांची ये-जा वाढते. घरांमध्ये पाहुण्यांची वर्दळ असते, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा परिस्थितीत रस्त्यांचे खोदकाम सुरूच राहिल्यास वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णजन्माष्टमीपूर्वी खोदकामाचे काम पूर्ण करून रस्ते तातडीने पूर्ववत करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काम पूर्ण करणे शक्य नसल्यास किमान वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची व्यवस्था करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.