मोर्शी,
Threat to MP Anil Bonde मोर्शी - वरूड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, कृषी मंत्रीपद व विद्यमान राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांना सोशल मीडिया वरून मारण्याची धमकी देणाऱ्या व त्यांच्या वडिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा. या मागणीसाठी शुक्रवारी तालुक्यातील शेकडो संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर धडक देऊन एक लेखी निवेदन सुनील सोमवंशी यांच्या नेतृत्वात ठाणेदार राहुल आठवले यांना दिले.
आमची मागणी मान्य न झाल्यास मोर्शी - वरूड तालुक्यातील हजारो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असा इशारा सुद्धा देण्यात आला. मोर्शी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, खा. बोंडे व त्यांच्या वडीलांना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख पराग गुडधे याने सोशल मीडियावर जाहीरपणे अर्वाच्च भाषेत बोलून शिविगाळ केली. डॉ. बोंडे यांचे तोंड फोडण्याची जाहीरपणे धमकी दिली. या धमकीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे नमुद आहे. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष आप्पा गेडाम, कैलास फंदे, नितीन उमाळे, राहुल चौधरी, अजय आगरकर, ज्योती प्रसाद मालवीय, दत्ता गेडाम पाटील, ब्रह्मानंद देशमुख, अजिंक्य लुंगे, रुपेश ढोले, रवी मोरे, सतीश लेकुरवाळे, रवी मेटकर,श्रीकांत सीनकर यांच्याससह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.