तुळजापूर,
Tuljabhavani festival महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा ११ ते २७ ऑक्टोबरदरम्यान पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. घटस्थापनेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या १५ दिवसांच्या धार्मिक सोहळ्यात विविध पूजा, अलंकार आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य उत्सवाची सुरुवात होण्यापूर्वीच ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. दुपारी घटस्थापना झाल्यानंतर रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून, याच दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाला अधिकृत सुरुवात होईल.

१२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान देवीची नित्योपचार पूजा पार पडणार असून, रात्री छबिना मिरवणूक काढली जाणार आहे. १५ ऑक्टोबरला ललिता पंचमीनिमित्त दुपारी रथ अलंकार महापूजा होईल. त्यानंतर रात्री छबिना मिरवणूक होईल. १६ ऑक्टोबरला मुरली अलंकार पूजा, तर १७ ऑक्टोबरला शेषशाही अलंकार पूजा केली जाणार आहे. या दोन्ही दिवशी रात्री छबिना मिरवणूक काढली जाईल.१८ ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार पूजा होणार आहे. १९ ऑक्टोबरला दुर्गाष्टमीनिमित्त महिषासुर मर्दिनी अलंकार पूजा तसेच वैदिक होम-हवनाचा धार्मिक विधी पार पडेल. रात्री नेहमीप्रमाणे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसऱ्याचा मुख्य सोहळा होईल. दुपारी १२ वाजता होमावरील धार्मिक विधी आणि घटोत्थापन केले जाईल. त्यानंतर रात्री नगरहून येणाऱ्या पलंग आणि पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे सीमोल्लंघनाचा पारंपरिक सोहळा होईल. त्यानंतर देवी मंचकी निद्रेस जाणार असून, सलग ५ दिवस हा विधी राहणार आहे. २१ ऑक्टोबरला सीमोल्लंघनानंतर माता नगरच्या पलंगावर विसावणार आहे. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी पहाटे पुन्हा देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. याच दिवशी दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापुरात आगमन होणार आहे. रात्री या काठ्यांसह भव्य छबिना मिरवणूक काढण्यात येईल. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तुळजाभवानी मातेच्या या उत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध भागांसह आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथूनही मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल होतात. भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.