बंगळूरु,
vaibhav shines with the ball दुलीप ट्रॉफी २०२६ मधील पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात पूर्व विभागाने ईशान्य विभागावर एक डाव आणि २१० धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पूर्व विभागाकडून उपकर्णधार वैभव सूर्यवंशीला फलंदाजीत विशेष प्रभाव पाडता आला नाही. मात्र, गोलंदाजी करताना त्याने दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
सामना संपल्यानंतर वैभवने आपल्या गोलंदाजीचा अनुभव सांगितला. बीसीसीआयने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, एका टप्प्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट्स मिळत नसल्याने त्याला दोन ते तीन षटके गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. ईशान किशनला त्याला गोलंदाजी देणे हा काहीसा धोका वाटत होता. मात्र, आपण विकेट घेणारा गोलंदाज असल्याचे ईशानला माहीत नव्हते, असे वैभवने मजेशीरपणे सांगितले.
आपल्याला केवळ तीन षटके मिळणार असल्याचे लक्षात घेऊन प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर आणि योग्य दिशेने टाकण्यावर भर दिल्याचे वैभवने सांगितले. पाच विकेट घेण्याची क्षमता असली तरी संधी फक्त तीन षटकांची होती, त्यामुळे त्या मर्यादित संधीचा पूर्ण फायदा घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. याच गोलंदाजीतून त्याला दोन विकेट मिळाल्या.
फलंदाज म्हणून या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने गोलंदाजीतून संघासाठी योगदान देता आल्याचा आनंद अधिक असल्याचे वैभवने सांगितले. विकेट मिळाल्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, असेही त्याने नमूद केले. फलंदाजांना गोलंदाजी करण्याची आणि गोलंदाजांना फलंदाजी करण्याची इच्छा असते, कारण दोन्ही प्रकारच्या कामगिरीत वेगळा आनंद मिळतो, असे त्याने म्हटले.
दरम्यान, दुलीप ट्रॉफी २०२६ चे उपांत्य सामने ३० ऑगस्टपासून बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सुरू होणार आहेत. पहिल्या उपांत्य सामन्यात पूर्व विभागाची गाठ मध्य विभागाशी पडणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग आमनेसामने असतील. पूर्व विभागाला अंतिम फेरीत पोहोचवण्यासाठी वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. उपांत्यपूर्व सामन्यात त्याला केवळ ८ धावांवर बाद व्हावे लागले होते.