धारणी
witchcraft जादूटोण्याच्या संशयावरून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा व धारणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले.

धारणी तालुक्यातील गोबरकहू येथील ५८ वर्षीय महिला समोती रामभाऊ कासदेकर हिची शेतात गळा आवळून हत्या करण्यात आली होती. समोतीचे पुत्र राजू कासदेकर यांनी याबाबत धारणी पोलिस ठाण्यात २७ आगस्टला तक्रार नोंदवली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखे पथकासही समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धारणी पोलिस ठाणे व गुन्हे शाखेचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले. २८ आगस्टला गावातीलच रामलाल लक्ष्मण कासदेकर हा गावाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शेतामध्ये जाऊन रामलाल कासदेकर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता मृतक महिला ही जादुटोणा करते व त्यामुळे त्याच्या परिवाराला त्रास होत असल्याच्या संशयावरून आपण तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. गुन्हा घडल्यापासून केवळ चोवीस तासाच्या आता पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेतले.