अरे...विश्वचषक जिंकला तरी सूर्या संघाबाहेर!

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
मुंबई,
surya is out of the team टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार राहिल्यानंतर सूर्यकुमार यादवला पुढील मालिकेसाठी संघातूनच वगळण्यात आल्याने मोठा धक्का बसला. जुलै २०२४ मध्ये टी-२० संघाची धुरा स्वीकारल्यानंतर सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने एकही टी-२० मालिका गमावली नाही. त्याच्या नेतृत्वात भारताने आशिया कप आणि टी-२० विश्वचषकावरही नाव कोरले. मात्र, २०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर निवड समितीने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवले.
 
surya is out of the team
 
संघाची घोषणा झाल्यानंतर आपले नाव नसल्याचे समोर आल्यावर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया वेगळीच होती. माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्राशी संवाद साधताना त्याने सांगितले की, अशा प्रसंगी दबाव कमी करण्यासाठी किंवा स्वतःला शांत ठेवण्यासाठी तो अनेकदा हसतो. त्यामुळे संघातून बाहेर असल्याचे कळल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. मात्र, त्यानंतर हा निर्णय नेमका कसा झाला, हा प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत राहिला.
  
सूर्यकुमारने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. एकही मालिका न गमावता विश्वचषक आणि आशिया कप जिंकल्यानंतरही अचानक बदल का करण्यात आला, याचा तो विचार करत राहिला. त्याने कबूल केले की, तो काहीसा निराश झाला होता. सुमारे दीड महिना घरी असताना या निर्णयाचा विचार त्याच्या मनात सुरू होता. मित्र आणि कुटुंबीयांनी हा आयुष्याचा एक भाग असल्याचे सांगून त्याला धीर दिला. मात्र, सर्वजण निघून गेल्यानंतर एकटेपणात हा प्रश्न पुन्हा मनात येत असल्याचे त्याने सांगितले.
 
सूर्यकुमारने आपल्या आयपीएलमधील कामगिरीचाही उल्लेख केला. आयपीएलमध्ये त्याची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नसली, तरी नुकताच विश्वचषक जिंकलेल्या कर्णधाराला लगेच संघाबाहेर का केले गेले, हे त्याला समजून घ्यायचे होते. त्यामुळे त्याने स्वतःलाच ‘हे कसं घडू शकतं?’ आणि ‘हे कसं शक्य आहे?’ असे प्रश्न विचारल्याचे सांगितले.
 
दरम्यान, संघाची अधिकृत घोषणा होण्याच्या दोन-तीन दिवस आधीच निवड समितीने सूर्यकुमारशी संपर्क साधला होता. पुढे जाण्याची वेळ आली असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. यावर आपण कोणताही वाद घातला नाही किंवा निर्णयाला विरोध केला नाही, असे सूर्यकुमारने स्पष्ट केले. संघाच्या हितासाठीच हा निर्णय घेतला गेला असेल, त्यामुळे तो स्वीकारणे आपले कर्तव्य असल्याचेही त्याने सांगितले. संघाबाहेर असतानाही भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सूर्यकुमार यादव मेहनत घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले.