‘पवित्र पोर्टल’ची गोंदिया जिल्हा परिषदेला भेट!

पहिल्या टप्प्यात ४४५ शिक्षक उपलब्ध, दुसर्‍या टप्प्यात १८५ शिक्षक भरण्याची शक्यता

    दिनांक :29-Aug-2026
Total Views |
गोंदिया
zilla-parishad gondia ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल ४४५ शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेला उपलब्ध झाले असून, त्यांचे तातडीने समुपदेशन करून रिक्त शाळांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. हे शिक्षक १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील शाळांमध्ये रुजू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता शिक्षकांची केवळ १८५ पदे रिक्त राहणार असून, दुसर्‍या टप्यात ही पदे भरली जाणार असल्याची शक्यता प्राथमिक शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

pavitra portal 
 
गोंदिया जिल्हा परिषद, अंतर्गत शिक्षक भरतीसाठी रिक्त पदांची माहिती शासनाला देण्यात आली होती. यात प्राथमिकचे बंगाली माध्यमाचे ५, हिंदी माध्यमाचे ९५, मराठी माध्यमाचे ४७८ तर माध्यमिकचे मराठी माध्यमाचे ५० अशा एकूण ६२८ पदांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला उपशिक्षक तसेच पदवीधर शिक्षक या पदांसाठी शिक्षक उपलब्ध झाले आहेत. ज्यामध्ये प्राथमिकचे बंगाली माध्यमाचे ३, हिंदी माध्यमाचे ६७, मराठी माध्यमाचे ३३० तर माध्यमिकचे मराठी माध्यमाचे ४५ पदांना मंजुरी प्रदान केली आहे. दरम्यान, त्यांची नियुक्ती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून उपलब्ध शिक्षकांना नियुक्तीच्या शाळांवर लवकरात लवकर रुजू करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
माध्यम     रिक्त जागा     प्राप्त    उमेदवार
बंगाली     प्राथमिक        ०५        ०३
हिंदी       प्राथमिक        ९५        ६७
मराठी    प्राथमिक        ४७८      ३३०
मराठी    माध्यमिक        ५०        ४५
.............................................................
एकूण ६२८ ४४५
.............................................................
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. उपलब्ध झालेले ४४५ शिक्षक तातडीने शाळांमध्ये रुजू झाल्यास त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे.
* लायकराम भेंडारकर, अध्यक्ष, जि.प .गोंदिया
 
येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यात सर्वप्रथम शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून समुपदेशनाद्वारे संबंधित शिक्षकांना शाळांची नियुक्ती देण्यात येईल. पुढील १० ते १५ दिवसांत सर्व शिक्षक संबंधित शाळांमध्ये रुजू होतील.
* पवन खंडारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. गोंदिया