अभिनेत्री अदिती शर्माची पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

चारित्र्यावर संशय, दागिने परत न दिल्याचा आरोप, आई-वडिलांशी बोलण्यासही मज्जाव केल्याची तक्रार

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
मुंबई,
actress aditi sharma टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अदिती शर्मा यांनी पती तसेच सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अभिनेत्रीने पती अभिनीत विद्यानंद कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद कीर्ती कौशिक यांच्यावर शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ, चारित्र्यावर संशय घेणे आणि स्त्रीधनाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीनंतर ३१ जुलै रोजी तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

अभिनेत्री अदिती शर्मा  
 
 
पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, जून २०२१ मध्ये ऑनलाइन अभिनय वर्गादरम्यान अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी विवाह केला. त्यापूर्वी सप्टेंबर २०२४ पासून हे दोघे गोरेगाव पश्चिम येथील एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
अदितीच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच पतीच्या वागणुकीत मोठा बदल जाणवू लागला. तिच्या कपड्यांवर आक्षेप घेणे, किरकोळ कारणांवरून वाद घालणे आणि घरखर्चासाठी मदत करण्याऐवजी तिच्याकडूनच पैसे मागणे, असे प्रकार सुरू झाल्याचा आरोप तिने केला आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, १ जानेवारी २०२५ रोजी कॉफी बनवण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पतीने तिच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत चारित्र्यावर संशय व्यक्त केला. याच काळात तिचा मोबाईल नियमितपणे तपासणे, तिच्यापासून वेगळ्या खोलीत राहणे आणि आई-वडिलांशी संवाद साधण्यास मज्जाव करणे, अशा प्रकारे मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोपही अदितीने केला आहे.
याशिवाय, लग्नावेळी मिळालेले सोन्याचे दागिने, हिऱ्याची अंगठी, मंगळसूत्र, बांगड्या आणि इतर दागिने सासूने स्वतःकडे ठेवले असून, अनेकदा मागणी करूनही ते परत दिले नसल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.actress aditi sharma कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सासू आणि नणंद घरी आल्या असताना त्यांनी पतीची बाजू घेत आपला मानसिक छळ अधिक वाढवल्याचाही दावा तिने तक्रारीत केला आहे.
अदिती शर्माच्या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी पती, सासू आणि नणंदाविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.