देवळी,
rajesh-bakane : देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीसाठीचा वीजपुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकर्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत आ. राजेश बकाने यांनी ६३ ऐवजी १०० केव्हीए ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी केली.
आ. बकाने म्हणाले की, सध्या अनेक गावांमध्ये ६३ केव्हीए क्षमतेच्या एका ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात कृषी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार येत आहे. परिणामी, वारंवार वीज खंडित होणे, कमी दाबाची वीज मिळणे, ट्रान्सफॉर्मर जळणे किंवा बिघाड होणे अशा समस्या निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे.
यंदा पाऊस अनिश्चित असून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक भागांमध्ये पिकांना ओलीत करण्याची गरज भासू लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना विद्युत पंपाच्या माध्यमातून सिंचनावरच अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, वीजपुरवठाच सुरळीत नसेल तर शेतकर्यांसमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते, असेही आ. बकाने यांनी लक्षात आणून दिले. ज्या गावांमध्ये ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मरवर जास्त प्रमाणात वीज जोडण्या आहेत त्या ठिकाणी तातडीने १०० केव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीला आवश्यक असलेला अखंड व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आ. बकाने म्हणाले.