अहिल्यानगर,
Audit of Shani Shingnapur temple अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांची आता फॉरेन्सिक चौकशी करण्यात येणार आहे. देवस्थानच्या १ जानेवारी २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीतील आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक लेखापरीक्षण केले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली आहे. शनैश्वर देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी देवस्थानकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. न्याय व विधी विभागाच्या मान्यतेनंतर आता या चौकशीला सुरुवात झाली असून, मुंबई येथील एका सनदी लेखापाल संस्थेची फॉरेन्सिक ऑडिटसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
या तपासणीमध्ये १ जानेवारी २०२० ते २०२५ या कालावधीतील देवस्थानच्या सर्व आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा कालावधी देवस्थानवरील तत्कालीन विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळातील आहे. २२ सप्टेंबर २०२५ पासून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले असून, त्यानंतर नाशिक विभागीय आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभाराबाबत यापूर्वी अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. पूजा अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. भाविकांकडून जमा होणारी रक्कम देवस्थानच्या काही कर्मचाऱ्यांच्या नावावर जमा होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
याशिवाय देवस्थानमधील कामगार भरती प्रक्रियेवरही आक्षेप घेण्यात आले होते. कोणतेही निश्चित निकष न लावता भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होता. या सर्व पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रकरणातील याचिकाकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनीही या चौकशीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. देवस्थानमधील कथित गैरव्यवहारांची ईडी आणि सीबीआयमार्फत संपूर्ण चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईपर्यंत आपण पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आठ आठवड्यांत कारवाई झाली नाही तर पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.