चिखलदरा,
chikhaldara : विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यात पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पर्यटकांकडून पार्किंगच्या नावावर पैसे घेऊनही पार्किंगच्या ठिकाणी चिखल, पाणी आणि गटारांची दुरवस्था असल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. त्यामुळे चिखलदऱ्यात पर्यटनाच्या नावाखाली सुविधा देण्याऐवजी कथित वसुली सुरू आहे का, असा सवाल पर्यटक करीत आहेत.

विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या एका पदाधिकाऱ्याच्या शेतातच वाहने पार्किंग करण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, वाहनधारकांना पर्यायी जागेवर पार्किंग करण्यापासून कथितरीत्या रोखले जात असल्याचा आरोप आहे. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाहनधारक व पर्यटकांवर ‘आम्ही सांगतो त्याच ठिकाणी पार्किंग करा’ असा दबाव टाकला जात आहे. या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, पार्किंग व्यवस्थेच्या नावाखाली कोणाचा आर्थिक फायदा होत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पार्किंगच्या आजूबाजूला आदिवासी बांधवांची शेती असतानाही त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पण, हेतूपुरस्सर पार्किंग २ किलोमीटर दूर का, अशी चर्चा होत आहे. दुसऱ्या दिशेने वाहन घेऊन जाण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पण याकडे तेथील पोलिस प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या रकमेची अधिकृत पावती पर्यटकांना दिली जाते का? जमा होणाऱ्या रकमेचा हिशेब कोण ठेवतो? ती रक्कम नगरपरिषदेच्या खात्यात जमा होते की अन्य कोणत्या पद्धतीने तिची वसुली केली जाते? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
//प्रशासनाचे चिखलदऱ्याकडे दुर्लक्ष
चिखलदऱ्यात पर्यटनावर हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार, वाहनचालक, स्थानिक विक्रेते आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. पर्यटकांची संख्या वाढत असताना त्यांना स्वच्छता, पार्किंग, वाहतूक नियोजन, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पार्किंगच्या नावाखाली शुल्क आकारूनही सुविधा मिळत नसतील तर पर्यटकांनी जायचे कशाला, असा प्रश्न विचारला जात आहे.