भारतीय संघाच्या दुखापतींचा ‘हिशोब’ सुरू!

बीसीसीआय घेणार सपोर्ट स्टाफवर मोठा निर्णय

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
मुंबई,
BCCI to take a decision on support staff भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या सातत्याने वाढणाऱ्या दुखापतींमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वैद्यकीय आणि सपोर्ट स्टाफच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. हेड कोच गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे मुख्य फिजिओ कमलेश जैन यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात असून, श्रीलंका दौऱ्यानंतर त्यांच्या भवितव्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.गेल्या काही महिन्यांत भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. जसप्रीत बुमराह हे ताजे उदाहरण असून, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी हेही दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना गमवावा लागला, तर दुसऱ्या सामन्यातील त्याच्या सहभागाबाबतही अनिश्चितता कायम आहे. साई सुदर्शनलाही बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) कडून फिटनेस मंजुरी मिळाल्यानंतरच संघात स्थान देण्यात आले.
 
 

BCCI to take a decision on support staff 
 
 
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान या दुखापतींचा फटका संघाला वारंवार बसला. कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही खेळाडूंच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली आहे. ऐनवेळी खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने संघाला अपेक्षित सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवता आले नसल्याचे त्यांनी मान्य केले.लॉर्ड्स कसोटीनंतर शुभमन गिल म्हणाला, "सामन्याच्या दिवशी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचे समजणे संघासाठी मोठा धक्का असतो. पाच गोलंदाजांसह मैदानात उतरल्यावर त्यातील एखादा खेळाडू काही षटकांतच बाहेर गेला, तर उर्वरित गोलंदाजीवर मोठा ताण येतो. त्यामुळे संघाने फिटनेसच्या बाबतीत अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. वाढत्या दुखापतींमुळे बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलेंस आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही वरिष्ठ खेळाडू उपचारासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमऐवजी बाहेरील तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
 
 
माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांच्या जागी एड्रियन ले रू यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रशिक्षण पद्धतीत बदल झाले असून, अनेक खेळाडूंना त्या नव्या प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागत आहे.बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, कर्णधार आणि प्रशिक्षकांना सर्वोत्तम १५ खेळाडू उपलब्ध नसतील, तर संतुलित संघ निवडणे कठीण होते. त्यामुळे योग्य वेळी खेळाडूंच्या फिटनेसबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी सपोर्ट स्टाफ आणि सेंटर ऑफ एक्सीलेंसवर आहे. भारतीय संघाचा आगामी कार्यक्रम अत्यंत व्यस्त असून श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेनंतर बीसीसीआय मुख्य फिजिओ कमलेश जैन आणि संघाचे डॉक्टर डॉ. रिझवान खान यांच्या भूमिकेबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. कमलेश जैन यांनी २०२२ मध्ये नितीन पटेल यांची जागा घेतली होती. मात्र, वाढत्या दुखापतींच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय वैद्यकीय विभागात मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.