अमरावती,
municipal-council : दर्यापुरात राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत भाजप कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेले बॅनर दर्यापूर नगरपरिषदेच्या पथकाने हटवल्याने राजकीय वातावरण अचानक तापले. या कारवाईचा निषेध करीत संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि उबाठा शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या राजकीय दबावाखाली येऊनच नगरपरिषद प्रशासन भाजपच्या बॅनरवर कारवाई करीत असल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी केला. शहरात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे अनेक अवैध बॅनर आणि होर्डिंग्स उघड्या डोळ्यांनी दिसत असताना नगरपरिषदेला फक्त भाजपच्याच नेत्यांचे बॅनर कसे काय दिसतात, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पक्षपातीपणे बॅनर हटवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे.
या ठिय्या आंदोलनात भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश पदाधिकारी सलीम घाणीवाले, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ढोकणे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के, दर्यापूर शहर मंडळ अध्यक्षा मेघा भारती, नगरपरिषद गटनेते व भाजपा जिल्हा सचिव दिनेश पारडे, नगरसेवक मयूर लांडे, रवींद्र राजपूत, गोकुळ पाटील, संकेत भुतडा, आरती वाभडे, कृष्णा स्वामी, सुरेश वाभडे, शुभम गजभिये यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन तासांच्या या आंदोलनामुळे नगरपरिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के म्हणाले की, दर्यापूर नगरपरिषद प्रशासन लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली पक्षपातीपणा करीत आहे. काँग्रेसचे खासदार आणि उबाठा आमदारांच्या सांगण्यावरूनच हे बॅनर हटवण्यात आले. शहरातील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे बेकायदेशीर बॅनर प्रशासनाला दिसत नाहीत का, केवळ भाजपच्या नेत्यांचे बॅनर टार्गेट करून काढणाऱ्या त्या पक्षपाती अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन झालेच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे ते म्हणाले.