महाराष्ट्रातील मुसळधार पावसाला तात्पुरता ब्रेक

    दिनांक :03-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Break in heavy rains in Maharashtra गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी होत असून ही हवामान प्रणाली गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे राज्यातील मुसळधार पावसाला काहीसा विराम मिळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहेया कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारत, मध्य भारत आणि विदर्भात गेल्या काही दिवसांत जोरदार पावसाची नोंद झाली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनाही त्याचा फटका बसला. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या.
 
 
Break in heavy rains in Maharashtra
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता घटत असल्याने मान्सूनच्या हालचालींमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाऐवजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. अनेक भागांत अधूनमधून रिमझिम पाऊस पडेल, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहू शकते.विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यामुळे या भागातील पावसाचाही जोर आता हळूहळू कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
 
व्यापक स्वरूपाच्या अतिवृष्टीची शक्यता सध्या कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक हवामानातील बदलांमुळे काही ठिकाणी अल्पकालीन जोरदार सरी पडू शकतात. दरम्यान, पावसाचा जोर कमी होत असला तरी मान्सून अद्याप सक्रिय आहे. पुढील काळात वातावरणात पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाल्यास पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी, फवारणी आणि खत व्यवस्थापनासारखे कृषी निर्णय घेताना स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनीही हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.